छत्रपती संभाजीनगर : सलग २००९ पासून चव्हाण कुटुंबियांच्या ताब्यात असणाऱ्या भोकर मतदारसंघातील भोकर नगरपालिकेच्या निवडणुकीत खासदार अशोक चव्हाण यांनी पुन्हा कंबर कसली आहे. त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण जरी आमदार असल्या तरी निवडणुकीतील सर्व निर्णय अशोक चव्हाण हेच घेणार आहेत. नगराध्यक्ष राहिलेल्या विनोद चिंचाळकर यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरविण्याची तयारी आता करण्यात आली आहे.
या मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपचे कमळ हे चिन्ह माहीत झाले. तत्पूर्वी राजकीय विरोध करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मात्र या मतदारसंघात फारशी किंमत नाही. भोकरमध्ये पुन्हा चव्हाण यांचे वर्चस्व कसे राहील, याची आखणी आता पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात येते. गावात सध्या एकही उद्यान नाही, स्वच्छतागृहे नाहीत, स्वच्छतेची ओरड सुरूच असते. त्याकडे फारसे कोणाचे लक्ष नसते.
भाेकरमधील रस्त्यांची परिस्थितीही फारशी चांगली नाही. मात्र, अशा समस्यांमुळे रोष वाढण्याची शक्यता नसल्याने निवडणुकीमध्ये सारे चव्हाण म्हणतील तसे, असे चित्र असल्याचे सांगण्यात येते. भोकर पालिका क्षेत्रात २८ हजार मतदार आहेत. शहरात मुस्लिमांची संख्या अधिक आहे. माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकरांचे बंधू सुभाष किन्हाळ भोकरमधून नगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. पण ते रिंगणात उतरणार का, हे अद्याप स्पष्ट नाही.
अन्य कोणत्याही पक्षापेक्षा अशोकराव चव्हाण आणि आता त्यांच्या कन्या श्रीजया याच कारभार पाहत असल्याने आता फक्त चिन्ह बदलेले आहे, एवढीच भावना भोकर नगरपालिका क्षेत्रात असल्याची चर्चा राजकीय पटलावर आहे. ११ प्रभागातील २२ उमेदवार आणि नगराध्यक्ष अशा तीन मतदानासाठी रणनीती ठरवली जात आहे. मुस्लिम समाजातील अधिकाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतील, अशी रणनीती आखली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
