कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प रेटण्याची भूमिका राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिसून आल्यानंतर कोल्हापुरात विरोधकांनी आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या प्रकल्पाविरुद्ध आणखी प्रखरपणे लढा देण्याचा इरादा व्यक्त केला आहे. तर, शेतकऱ्यांचा विरोध हा मुद्दा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना अडचणीचा ठरत असला तरी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन ठाम विरोधाची भूमिका घेणार का, याबाबत मात्र साशंकता दिसत आहे.

राज्य शासनाने वर्धा ते पत्रादेवी सिंधुदुर्ग हा ८६ हजार कोटी रुपयांचा महत्त्वकांक्षी शक्तिपीठ प्रकल्प राबवण्याचे ठरवले आहे.१२ जिल्ह्यातून जाणाऱ्या या प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद करणारा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पाला १२ जिल्ह्यातून विरोध होत असला तरी कोल्हापूर जिल्ह्यात त्याची तीव्रता सर्वाधिक दिसते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला वळसा घालून हा प्रकल्प शेजारच्या सांगली जिल्ह्यातून कोकणात जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

असे असले तरी शक्तिपीठ प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातील विरोध मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरही दिसून आला आहे. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे, अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग समांतर असताना पुन्हा त्याच मार्गावरील शक्तिपीठ प्रकल्पाची गरज नसल्याचा मुद्दा मांडला आहे. या प्रकल्पाविरोधात यापूर्वी कोल्हापूरसह राज्यात परिषद, मेळावे घेऊन तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मुंबईत धरणे आंदोलन करून विरोधाची धार दाखवून दिली आहे. आता तो साकारण्याचा प्रयत्न झाल्यास यापेक्षाही तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यभर आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना देशोधडी लावणारा हा प्रकल्प कोल्हापूरसह राज्यभरात होवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. विदर्भ – मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले शेट्टी यांनी त्या भागात शेतकऱ्यांसमवेत शक्तिपीठ प्रकल्पाला बांधावर जाऊन विरोधाची भूमिका दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. कोल्हापूर – सांगली या भागात शक्तीपीठ विरुद्धची लढाई आक्रमकपणे लढण्याची तयारी त्यांनी चालवलेली आहे.

मंत्र्यांच्या भूमिका निर्णायक

कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका काहीशी सावध दिसते. शक्तीपीठ प्रकल्पाला शेतकऱ्यांचा होणारा टोकाचा विरोध त्यातून विधानसभा निवडणुकी वेळी कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ प्रकल्प होणार नसल्याची निघालेली अधिसूचना हे संदर्भ लक्षात घेऊन मंत्रिद्वयांनी शेतकऱ्यांच्या थेट विरोधात भूमिका घेणे राजकीयदृष्ट्या नुकसानीचे ठरणार असल्याची जाणीव ठेवून सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प पुढे नेण्याच्या मानसिकतेत आहेत,अशी मखलाशी त्यांनी करीत बंदूक मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर ठेवून स्वतः अडचणीत येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. तरीही, मुख्यमंत्र्यांचा शब्द अव्हेरून कोल्हापूर जिल्ह्यातील हे दोन्ही मंत्री ठामपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून आपली भूमिका मांडणार का याकडे लक्ष वेधले आहे.

यावरूनच आमदार सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर या मंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील भूमिकेबाबत साशंकता व्यक्त केली आहे. शक्तिपीठ प्रकल्पाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी विरोध दर्शवला की नाराजी दर्शवली याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे म्हणत पाटील यांनी महायुतीमध्ये दोन्ही पक्षांची हतबलता दिसते असा टोला लगावला आहे.