जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अमळनेरमधील आमदार अनिल पाटील यांनी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रि‍पद मिळाले नाही म्हणून, आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी मंत्री असताना मिळालेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था नाकारली होती. त्यांनी स्वतः त्याविषयीचे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. अनिल पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची नाराजी परवडणारी नसल्याचे लक्षात घेत अजित पवार गटाने आमदार पाटील यांची नाराजी उशिरा का होईना दूर करण्याचा प्रयत्न केला असून, त्यांना पक्षात मोठी संघटनात्मक जबाबदारी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव जिल्ह्यात महायुतीचे एकूण ११ आमदार असले तरी, त्यात भाजप व शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) प्रत्येक पाच संख्याबळ आहे. एकमेव अमळनेरची जागा राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसकडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात भाजप व शिंदे सेनेला प्रत्येकी एक आणि अजित पवार राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळेल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून बांधला गेला होता. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह अनिल पाटील यांचीही मंत्रिपदी पुन्हा वर्णी लागणार असल्याचे ठामपणे सांगितले जात होते. प्रत्यक्षात, मंत्रिमंडळ विस्तारावेळी अनिल पाटील यांना बाजूला ठेवण्यात आले. पाटील यांच्याऐवजी भाजपचे संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली. मंत्रीपद नाही किमान एखादे महामंडळ तरी मिळेल, या आशेवर असलेल्या पाटील यांना त्यासाठीही विचारले गेले नाही. त्यामुळे पूर्वीसारखा मान सन्मान राहिलेला नसताना वाय प्लस दर्जाची सुरक्षा काय कामाची, असा विचार करून अनिल पाटील यांनी ती काढून घेण्याचे पत्र पोलीस अधीक्षकांना देत आपल्या नाराजीचे जाहीर प्रकटीकरण केले होते.

दरम्यान, मंत्रि‍पदासाठी विचार न झाल्याने सुरक्षा व्यवस्था नाकारून जाहीर नाराजी व्यक्त करणारे आमदार अनिल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून तातडीने मनधरणी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांची प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्षपदावर नियुक्ती केली असून, त्याबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यांच्या पक्ष संघटनेचे प्रभारी म्हणून त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी असणार आहे. अर्थातच, पक्षाकडून संघटनात्मक जबाबदारी मिळाल्यानंतर वैयक्तिक आमदार पाटील आणि त्यांच्या समर्थकांमधून समाधान व्यक्त होत आहे. त्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांच्या अमळनेर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष देखील केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar amalner mla anil patil organizational responsibility print politics news ssb