BJP Vice President candidate जगदीप धनखड यांनी सोमवारी (२१ जुलै) उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या प्रकृतिअस्वास्थ्याचे कारण देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पदाचा राजीनामा सादर केला. सोमवारी उशिरा रात्री आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे मुदतीपूर्वीच हे पद रिक्त झाले आहे. या रिक्त पदासाठी लवकरच निवडणुका होणार आहेत. काही दिवसांपासून उपराष्ट्रपतिपदी विविध नेत्यांच्या नावांबाबत तर्क केले जात आहेत. परंतु, आता हे स्पष्ट झाले आहे की, नवीन उपराष्ट्रपती भाजपामधूनच असणार आहे.
नवीन उपराष्ट्रपती भाजपाचाच
- पुढील उपराष्ट्रपती भाजपामधील एक अनुभवी नेते असतील, असे पक्षाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले आहे.
- माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांच्यासारख्या प्रमुख मित्रपक्षांचा भाजपा विचार करत आहे, असे सांगितले जात होते.
- “उपराष्ट्रपतिपदी पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ असलेला नेता असेल,” असे एका वरिष्ठ भाजपा नेत्याने सांगितले.
- जेडीयू नेते व केंद्रीय मंत्री राम नाथ ठाकूर यांनी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यामुळे त्यांचे नावदेखील चर्चेत आले होते. परंतु, भाजपाच्या सूत्रांनी या चर्चा खोट्या ठरवल्या. ही एक नेहमीची भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
- सूत्रांनी असेही सांगितले की, भाजपाने उपराष्ट्रपती पदाबद्दल जेडीयू नेतृत्वाशी कोणतीही चर्चा केलेली नाही.
निवडणुकीची तयारी सुरू
भारत निवडणूक आयोगाने घटनेच्या अनुच्छेद ३२४ अंतर्गत उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे आयोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. निवडणूक आयोगाची प्रारंभिक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात समावेश असलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे : (१) राज्यसभा आणि लोकसभेतील निर्वाचित, तसेच नामनिर्देशित सदस्यांचा समावेश असलेल्या इलेक्टोरल कॉलेजची तयारी; (२) रिटर्निंग ऑफिसर/सहायक रिटर्निंग ऑफिसर म्हणजेच निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती आणि (३) मागील सर्व उपराष्ट्रपती निवडणुकांमधील सामग्रीचा प्रसार.
विरोधी पक्षाने अद्याप सर्वोच्च पदासाठी कोणतेही नाव प्रस्तावित केलेले नाही. यापूर्वी उपराष्ट्रपतिपदाच्या १६ पैकी केवळ चार निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्ष आपल्या बाजूने एखादे नाव घेऊन येऊ शकतो. नवीन उपराष्ट्रपतींची निवड ही धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर होत आहे. माजी उपराष्ट्रपती धनखड यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२७ मध्ये संपणार होता. त्यांनी प्रकृतिअस्वास्थ्याचे कारण देत राजीनामा दिला असला तरी या निर्णयामागे नेमके काय कारण असावे, याबद्दल राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहेत.
धनखड हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. परंतु, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात विरोधकांनी पाठिंबा दिलेल्या महाभियोग प्रस्तावाला त्यांनी मंजुरी दिल्याने परिस्थिती बिघडली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरील त्यांची भूमिका, विशेषतः एका सार्वजनिक कार्यक्रमात कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना त्यांनी विचारलेले प्रश्न पक्षाला रुचले नाहीत. सरकारी सूत्रांनुसार, धनखड यांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचीही योजना होती.
त्यांच्या राजीनाम्यानंतर, सर्वोच्च पदासाठी सरकारची निवड कोण असेल याबद्दल अटकळी मांडल्या जात आहेत. काही जणांनी सांगितले होते की, भाजपा बिहारमधील आगामी निवडणुका लक्षात घेऊन मित्रपक्ष जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांची निवड करू शकते. परंतु, भाजपाच्या सूत्रांनी ही शक्यता फेटाळली आहे. त्यामुळे आता भाजपा आपल्या पक्षातील कोणत्या नेत्याचे नाव समोर करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.