PM Narendra Modi Inspiration : भारताचे दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा आपल्या देशाचे नेतृत्व करण्याचा मान पटकाविणारे नरेंद्र मोदी आज (१७ सप्टेंबर) ७५ वर्षांचे झाले आहेत. केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर येण्यापूर्वी ते दीर्घकाळ गुजरातचे मुख्यमंत्री होते. “माझ्या आयुष्यातील प्रेरणास्थान आणि शक्तीचा स्रोत माझी आईच आहे,” असा उल्लेख मोदी आपल्या भाषणात नेहमीच करताना दिसून येतात. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांच्या आई हिराबेन यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. हिराबेन या गांधीनगर जिल्ह्यातील रायसन गावात त्यांचे धाकटे पुत्र पंकज मोदी यांच्याकडे राहात होत्या. गुजरात दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदीही त्यांची नेहमीच भेट घेत असत. दरम्यान, हिराबेन यांनी नरेंद्र मोदी यांना कशी प्रेरणा दिली? यासंदर्भात घेतलेला हा आढावा…

जून २०२२ मध्ये आई हिराबेन यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या एका लेखात पंतप्रधान मोदींनी आपल्या आयुष्यासाठी आईने केलेल्या त्यागाची आणि योगदानाची आठवण करून दिली होती. “वडनगरमधील मातीच्या भिंती व कौलारू छत असलेल्या एका लहानशा घरात आमचे कुटुंब वाढले. आईने घरकामाबरोबरच इतर घरांमध्ये भांडी घासणे, चरख्यावर सूत कातणे यांसह विविध कामे करून आमचा सांभाळ केला”, असं मोदींनी आपल्या लेखात म्हटलं होतं. पावसाळ्यात आमच्या घरावरील छत गळायचे आणि संपूर्ण घरात पाणीच पाणी व्हायचे, त्यावेळी आई बादल्या आणि भांडी ठेवून ते पाणी रोखण्याचा प्रयत्न करीत होती, अशी आठवणही मोदींनी या लेखातून सांगितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी (छायाचित्र सोशल मीडिया)

मोदींच्या अनेक कल्याणकारी योजनांना आई हिराबेन यांची प्रेरणा लाभल्याचेही दिसून येते. महिला व दुर्बल घटकांसाठी असलेल्या योजनांमध्ये हे प्रतिबिंब दिसते. २०१६ मध्ये उत्तर प्रदेशातील बलिया येथे मोदींनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. त्या वेळीही मोदींनी आपल्या आईला कुटुंबासाठी जेवण बनवताना आलेल्या अडचणी आठवून सांगितल्या. “मी लहानपणी या सर्व परिस्थितीचा अनुभव घेतला आहे. माझी आई नेहमीच चुलीवर स्वयंपाक करायची. आमच्या घराला फक्त एकच खिडकी होती, त्यामुळे कधीकधी चुलीतून एवढा धूर निघायचा की- जेवण वाढत असताना ती आम्हाला दिसतही नव्हती. या अनुभवांमुळेच आमच्या सरकारने गरिबांना मोफत गॅस मिळण्यासाठी ही योजना सुरू केली आहे,” असं पंतप्रधान म्हणाले होते.

पंतप्रधान मोदी आणि हिराबेन मोदी (छायाचित्र सोशल मीडिया)

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आई हिराबेन यांनी दिलेल्या शिकवणींची अनेकदा आठवण करून दिली आहे. २०१४ मध्ये जेव्हा मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा देशात भ्रष्टाचाराबद्दलची नाराजी शिगेला पोहोचली होती. यावेळी मोदींच्या “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” या घोषणेला मोठी लोकप्रियता मिळाली होती. २००१ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर आई हिराबेन यांनी “मला तुझं सरकारी काम कळत नाही, पण कधीही लाच घेऊ नकोस, कोणाचे कधीही चुकीचे किंवा वाईट करू नको आणि गरिबांसाठी काम करत राहा,” असा उपदेश आपल्याला दिल्याचं मोदींनी आपल्या लेखात म्हटलं होतं. “गरिबीच्या कठीण परिस्थितीतही माझ्या आई-वडिलांनी कधी प्रामाणिकतेचा मार्ग सोडला नाही, कधी स्वाभिमानाशी तडजोड केली नाही, असेही मोदी म्हणाले होते.

पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आई (छायाचित्र सोशल मीडिया)

२०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी स्वच्छ भारत अभियानला सुरुवात केली. ही प्रेरणाही मला आई हिराबेन यांच्याकडूनच मिळाली असल्याचं ते म्हणाले होते. “वडनगरमध्ये आमच्या घराशेजारील नाला साफ करण्यासाठी कोणी आलं की आई त्यांना चहा दिल्याशिवाय कधीच परत पाठवायची नाही. सफाई कामगारांसाठी आमचं घर चहा मिळणाऱ्या घरामुळं प्रसिद्ध झालं होतं. आई घराच्या स्वच्छतेबाबतही काटेकोर होती. बिछाना अगदी स्वच्छ आणि नीटनेटका असावा असं तिला नेहमीच वाटायचं. त्यावर पडलेली एक सुरकुतीही ती सहन करीत नव्हती. थोडीशी घडी पडली तरी ती पुन्हा उचलून धूळ झटकून व्यवस्थित अंथरून साफ करायची. आजही तिच्या बिछान्यावर एकही घडी नको, अशी तिची अपेक्षा असते,” असे मोदींनी लेखात लिहिले होते.

हिराबेन मोदी (छायाचित्र सोशल मीडिया)

पंतप्रधान मोदींनी आपल्या साध्या राहणीमानाचे आणि काटकसरीच्या स्वभावाचे श्रेयही आई हिराबेन यांनाच दिले. ते लिहितात, “मी कधीच आईला सोन्याचे दागिने घातलेले पाहिले नाही. तिला त्यात कधीच रस नव्हता. आजही ती तिच्या छोट्याशा खोलीत अत्यंत साधेपणाने जीवन जगते. आईने आमच्याबरोबर नेहमीच इतरांच्या कुटुंबाचीही काळजी घेतली. अब्बास नावाचा एक मुस्लीम मुलगा आमच्याबरोबर राहत होता. त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे आमच्या वडिलांनी त्याला घरात आसरा दिला होता. अनेक वर्ष तो आमच्याबरोबर राहिला आणि त्याचे शिक्षण पूर्ण केले. आई आम्हाला जितका जीव लावायची तितकाच त्यालाही. दरवर्षी ईदच्या दिवशी ती त्याच्या आवडीचे पदार्थ करायची,” असे मोदींनी आपल्या लेखात लिहिले आहे.

पंतप्रधान मोदी त्यांच्या आईबरोबर चर्चा करताना (छायाचित्र सोशल मीडिया)

पंतप्रधानांनी लेखात असेही नमूद केले की, त्यांच्या आईने नेहमीच दुसऱ्यांच्या निवडींचा आदर केला आणि त्यांच्या स्वतःच्या इच्छा कधीही त्यांच्यावर लादल्या नाहीत. “मी इतर भावंडांपेक्षा थोडा वेगळा होतो, त्यामुळे माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आई नेहमीच प्रयत्न करायची. तिने या गोष्टीला कधीही ओझे मानले नाही किंवा कोणताही त्रास व्यक्त केला नाही. जेव्हा मी घर सोडून बाहेरगावी काम शोधण्याची तयारी केली, तेव्हा वडील खूप नाराज झाले होते. मात्र, आईने मला तात्काळ आशीर्वाद दिला आणि तुझ्या मनाला जे वाटेल ते कर असं म्हटलं, असेही मोदींनी आपल्या लेखात म्हटलं होतं.