पिंपरी : तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले आणि विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले चिंचवड मतदारसंघातील शत्रुघ्न काटे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत धुसफुस सुरू झाली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील भाजप अनेक गटांमध्ये विभागला गेला आहे. चार आमदारांचे चार गट आणि निष्ठावतांचा एक असे पाच गट पक्षात दिसून येतात. काटे यांच्या नियुक्तीमुळे विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या गोटात अस्वस्थतता आहे. काटे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षाने जगताप यांनाही ‘संदेश’ दिल्याची भाजपच्या गोटात चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता पिंपरी-चिंचवड शहर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सन २०१७ मध्ये महापालिकेवर भाजपचे कमळ फुलविले. चारवरून ७७ नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे प्रदेश नेतृत्वानेही स्थानिक पदाधिकाऱ्यांना ताकद दिली. अमर साबळे यांना राज्यसभेची खासदारकी, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन यांना महामंडळ, उमा खापरे यांच्याकडे महिला संघटनेचे राज्याचे नेतृत्व दिल्यानंतर विधान परिषदेतही संधी दिली. अमित गोरखे यांनी विधान परिषदेवर घेतले. अनुप मोरे यांच्याकडे युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्षपद दिले. त्यामुळे शहराकडे भाजपच्या प्रदेश नेतृत्वाचे शहरावर लक्ष असल्याचे दिसून येते. चार आमदार असलेला भाजप शहरात सर्वांत मोठा पक्ष आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे एक आमदार आणि शिवसेनेचे (शिंदे) श्रीरंग बारणे एकमेव खासदार आहेत. वाढत्या ताकदीसोबत भाजपमध्ये गटबाजीही वाढली आहे.
चिंचवडच्या पोटनिवडणुकीदरम्यान जगताप कुटुंबातील आमदार शंकर जगताप आणि माजी आमदार अश्विनी जगताप यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष झाला. त्या वेळी माजी नगरसेवकांच्या एका गटाने माजी आमदार अश्विनी जगताप यांच्यासोबत ठामपणे राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर दीड वर्षे त्यांच्यासोबत राहून या नगरसेवकांनी काम केले. २०२४ च्या निवडणुकीत माजी आमदार अश्विनी जगताप यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यांच्याऐवजी आमदार शंकर जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखालील गटाने आमदार जगताप यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. त्यामुळे पक्षाने काटे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद दिले. त्यामुळे एका गटाने महापालिका निवडणुकीसाठी आमदार शंकर जगताप यांच्याकडेच शहराध्यक्षपद कायम ठेवण्याची भूमिका घेतली. परंतु, खासदार, आमदाराला शहराध्यक्षपद दिले जाणार नसल्याचा निर्णय प्रदेश नेतृत्वाने घेतला.
शहराध्यक्षपदासाठी काटे यांच्यासह आमदार जगताप यांचे समर्थक नामदेव ढाके, विलास मडिगेरी, तसेच संजय मंगोडेकर, विजय फुगे, राजु दुर्गे हे इच्छुक होते. जगताप हे ढाके यांच्यासाठी आग्रही होते. पक्षात झालेल्या मतदानातही ढाके पुढे असल्याचे सांगितले जाते. परंतु, माजी आमदार अश्विनी जगताप यांनी काटे यांच्या बाजूने वजन टाकले. आमदार लांडगे यांनीही अप्रत्यक्षपणे काटे यांना साथ दिली. मंत्री गिरीश महाजन यांनीही लक्ष घातले. त्यातूनच काटे यांच्याकडे शहराध्यक्षपद आल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
‘राष्ट्रवादी’तून आलेल्यांनाच शहराध्यक्षपद
पिंपरी भाजपचे नेतृत्व २०१४ पासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांकडे आहे. सदाशिव खाडे यांच्यानंतर २०१४ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे शहर भाजपचे नेतृत्व दिले. त्यांच्या नेतृत्वात महापालिकेवर भाजपवर कमळ फुलले. त्यानंतर राष्ट्रवादीतून आलेलेच महेश लांडगे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या काळात महापालिकेची निवडणूक झाली नाही. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर शंकर जगताप यांच्याकडे शहराध्यक्षपद देण्यात आले. आता राष्ट्रवादीतून आलेल्या शत्रुघ्न काटे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वत: असे भाजपचे धोरण आहे. निवड होईपर्यंत मागण्याच्या अधिकार प्रत्येकाला असतो. एकदा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर कोणतीही नाराजी नसते. पक्षात गटबाजी नाही. सर्वांना सोबत घेऊन जात आहे. महापालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे. ३२ प्रभागांमधील इच्छुकांच्या गाठीभेटी घेणार आहे. – शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप