Prashant Kishor allegations बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘जन सुराज’चे संस्थापक प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पार्टी (भाजपा) नेते आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रशांत किशोर यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बलात्कार आणि हत्या प्रकरणात सम्राट चौधरी यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे आरोप करण्यात येत असल्यामुळे पक्षासाठी हे मोठ्या अडचणीचे ठरू शकते. प्रशांत किशोर नक्की काय म्हणाले? जाणून घेऊयात….
सम्राट चौधरींवर गंभीर आरोप
प्रशांत किशोर म्हणाले की, सम्राट चौधरी यांनी शिल्पी-गौतम बलात्कार आणि हत्या प्रकरणात ते संशयित होते की नाही हे स्पष्ट करावे. सरकारने १९९५ च्या हत्या प्रकरणात भाजपा नेत्याला तातडीने अटक करावी आणि उपमुख्यमंत्रिपदावरून दूर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) राजवटीत, १९९९ मध्ये एका कारमध्ये शिल्पी जैन आणि गौतम सिंग यांचे मृतदेह अर्ध-नग्न अवस्थेत आढळून आले होते. नंतर हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आले होते. प्रशांत किशोर म्हणाले, “मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना त्वरित त्यांच्या पदावरून हटवावे आणि हत्या प्रकरणात अटक करावी. १९९५ मध्ये तारापूर येथे ज्या सात लोकांची हत्या झाली होती, ते सर्व कुशवाहा जातीचे होते,” असे प्रशांत किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर असेही म्हणाले, “केस क्रमांक ४४/१९९५ मध्ये, त्यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कागदपत्रे सादर केली, ज्यात असे म्हटले होते की, राकेश कुमार ऊर्फ सम्राट चंद्र मौर्य ऊर्फ सम्राट चौधरी, (शकुनी चौधरी यांचा मुलगा) यांचा जन्म १ मे १९८१ रोजी झाला आहे. परिणामी, अल्पवयीन असल्याचे कारण देत त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती.” त्यांनी चौधरी यांच्या प्रतिज्ञापत्राची प्रत दाखवली आणि पुढे म्हटले, “२०२० मध्ये चौधरी यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे (ECI) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपले वय ५१ वर्षे नमूद केले होते. याचा अर्थ १९९५ मध्ये ते २६ वर्षांचे होते. तरीही आरोपी म्हणून त्यांची चुकीची ओळख असूनही न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले.
“न्यायालयाकडून सुटका होईपर्यंत ते तुरुंगातच राहायला हवेत.”
“हा व्यक्ती (सम्राट चौधरी) घटनात्मक पद भूषवत असताना देशाच्या कायद्याचा अनादर करत आहे, मी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना कारवाई करण्याची विनंती करतो. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई न केल्यास, आम्ही दोन ते तीन दिवसांत शिष्टमंडळासह राज्यपालांना भेटू. त्यांना एकतर बडतर्फ करून अटक करा किंवा हत्येच्या आरोपातील सर्व आरोपींना तुरुंगातून सोडा,” असेही ते पुढे म्हणाले.
त्यानंतर त्यांनी असा दावा केला की, सम्राट चौधरी यांच्यावर केवळ हत्येचा आरोप नाही, तर अत्यंत वादग्रस्त असलेल्या शिल्पी-गौतम बलात्कार आणि हत्या प्रकरणातही संशयित म्हणून त्यांचे नाव आहे. “या प्रकरणाची सीबीआयने चौकशी केली होती. सम्राट चौधरी यांनी स्पष्ट करावे की ते संशयित होते की नाही. जर त्यांनी नकार दिला, तर मी कागदपत्रे गोळा करून खुलासा करेन,” असे प्रशांत किशोर म्हणाले.
भाजपामध्ये अंतर्गत कलह?
भाजपाच्या काही नेत्यांनी हे आरोप निराधार आणि वैयक्तिक द्वेषातून प्रेरित असल्याचे सांगून फेटाळून लावले आहेत, तर काही भाजपा नेते यावरून सम्राट चौधरी यांना लक्ष्य करताना दिसत आहेत. बिहार भाजपाचे माध्यम प्रभारी दानिश इक्बाल म्हणाले, “प्रशांत किशोर स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी याचा वापर करीत आहेत. त्यांचे आरोप केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा एक हताश प्रयत्न आहे.” “तारापूर हत्याकांड प्रकरण न्यायालयात आधीच न्यायनिर्णीत झाले आहे आणि न्यायालयाने सम्राट चौधरी यांची आधीच निर्दोष मुक्तता केली आहे. चुकीचे आरोप केल्याबद्दल लालू प्रसाद यादव यांनाही त्यांची माफी मागावी लागली होती,” असे इक्बाल म्हणाले.
मात्र, पक्षाच्या नेत्यांवर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते आरके सिंह नाराज आहेत. “प्रशांत किशोर यांनी सम्राट चौधरी यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. जर सम्राट चौधरी यांनी या आरोपांना उत्तर दिले नाही तर त्यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हावे, असे सिंह यांनी म्हटले. त्यांचे मौन पक्षाची प्रतिमा खराब करत आहे,” असे ते म्हणाले. आरके सिंह यांनी शिफारस केली की, सम्राट चौधरी यांनी त्यांचे मॅट्रिक किंवा पदवी प्रमाणपत्र दाखवावे. जर त्यांनी तसे केले नाही तर सरकार आणि पक्षाच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होईल. “सम्राट यांनी पुढे येऊन त्यांची भूमिका स्पष्ट करावी. जर आरोप खोटे असतील तर सम्राट चौधरी यांनी प्रशांत किशोर यांच्याविरुद्ध खटला दाखल करावा,” असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आरके सिंह पक्षाविरुद्ध नाराजी व्यक्त करताना दिसले आहेत. ते त्यांच्या पराभवासाठी सम्राट चौधरींना जबाबदार धरतात.
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अश्विनी चौबे यांनीही या आरोपांवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, काही लोक मागच्या दाराने पक्षात प्रवेश करतात. त्यापैकी काही सुधारतात, परंतु जे तसे करत नाहीत त्यांना जनता सुधारते. हे लक्षात घेतले पाहिजे की सम्राट चौधरी अनेक पक्षांमधून भाजपामध्ये आले आहेत. चौबे यांनी प्रशांत किशोर यांना असाही सल्ला दिला की, जर त्यांच्याकडे सम्राट चौधरींविरुद्ध पुरावे असतील तर त्यांनी पत्रकार परिषद घेण्याऐवजी न्यायालयात जावे. प्रसिद्धी मिळवून कोणीही मोठा नेता होऊ शकत नाही.