रत्नागिरी – कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी राजकारणातून आधी निवृत्तीचे संकेत देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आता आहे. आता नेते आणि पदाधिकारी पक्ष का सोडतात नेतृत्वाला दिसत नाही का, असे म्हणते प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे एकमेव आमदार असलेले जाधव पक्ष सोडणार का , असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पक्षात मी नाराज नाही असे जाधव वारंवार सांगत असले तरी त्यांच्या कृतीतून ते समाधानी नाहीत हेच स्पष्ट होते.
पक्षफुटीनंतर झालेल्या निवडणूकीत शिवसेना ठाकरे गटाला कोकणात सपाटून मार खावा लागला. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकण प्रांतात ठाकरे गटाचा एकच शिलेदार निवडून आला. गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव विजयी झाले. ठाकरे गटातील इतर सर्व प्रमुख उमेदवारांचा शिंदे गटाने पराभव केला. मतदारसंघावर असलेली घट्ट पकड, दांडगा जनसंपर्क, उत्कृष्ट वक्तृत्व आणि विधानसभा कामकाजाचा दांडगा अभ्यास यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही जाधव आपला मतदारसंघ राखण्यात यशस्वी ठरले.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

सुरवातीला त्यांनी राजकीय सन्यास घेण्याचे संकेत देऊन खळबळ उडवून दिली. नंतर पक्षातील नेते आणि पदाधिकारी पक्षाला का सोडून जात आहेत. हे पक्षनेतृत्वाला दिसत नाही का म्हणून प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षातील पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली. पक्षाने विधानसभा निवडणूकीत विदर्भाची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. मात्र उमेदवार निश्चित करताना मला विश्वासात घेण्यात आले नाही, असा थेट आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मंत्रीपदासाठी जाधव यांचा विचार केला गेला नाही. शरदपवारांची साथ सोडणे चूक होती अशी सल त्यांनी बोलून दाखवली. जाधवांच्या या वक्तव्यामधून त्यांची अस्वस्थता आणि अगतीकता उघड झाली आहे. विधानसभा निवडणूकीनंतर विरोधी पक्ष नेते पद मिळेल अशी अपेक्षा जाधवांना होती. मात्र तसे झाले नाही. जाधव यांची नाराजी अधिकच वाढलेली दिसते.

या नाराजी मागे माजी खासदार विनायक राऊत असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पक्षाची जाबाबदारी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर सोपवली आहे. मात्र विनायक राऊत यांच्याशी जुळवून घेण्यात जाधवांना अडचण येत आहे. पक्षाच्या निर्णयात राऊत आमदारांना विश्वासात घेत नाहीत असा आक्षेप जाधवांचा आहे. त्यामुळे जाधवांची पक्षात कोंडी होत असल्याने ते आपली नाराजी उघडपणे बोलू लागले आहेत. यापूर्वी माजी आमदार राजन साळवी यांनीही विनायक राऊत यांच्यावर असेच आरोप केले होते. नंतर ते पक्षत्याग करत शिवसेना शिंदेगटात प्रवेश करते झाले होते. त्यामुळे नाराज जाधव पक्ष सोडणार का अशी चर्चा सूरू झाली आहे.

विधानसभा निवडणूकीपूर्वी चिपळूण मधून स्वतःला आणि गुहागर मधून मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी अशाच दबावतंत्राचा वापर केला होता. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. पक्षनेतृत्वाने त्यांना जुमानले नाही. आता पुन्हा पक्षात स्वतःचे महत्व वाढवून घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला असल्याचे दिसून येत आहे. पक्षाक़डून त्याला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

जाधवांची राजकीय वाटचाल कशी….

आमदार भास्कर जाधव यांनी आपली राजकीय कारकिर्दीला स्थानिक पातळी वरुन सुरुवात केली. १९९२ मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ते निवडून आले होते. महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले. तसेच यापूर्वी त्यांनी नगरविकास, वन, बंदर, क्रीडा, संसदीय कार्य, युवा कल्याण, माजी संरक्षण कल्याण, कायदा आणि सुव्यवस्था, मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. मात्र शिवसेना असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असो त्यांनी पक्षनेतृत्वावर दबाबतंत्राचा वापर करणे सोडलेले नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri shivsena leader bhaskar jadhav upset on uddhav thackeray know reasons print politics news css