Manmohan Samal Retained as Odisha chief २४ वर्षांनंतर ओडिशात भाजपाची सत्ता आली आणि नवीन पटनायक यांना सत्तेतून बाहेर व्हावे लागले. भाजपाने बहुमताचा आकडा गाठत ओडिशात ऐतिहासिक विजय मिळवला. याचे श्रेय ओडिशा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनादेखील दिले गेले. आता ओडिशामधील सत्ताधारी भाजपाकडून मनमोहन सामल यांची पुन्हा एकदा राज्य युनिटच्या अध्यक्षपदी सर्वसंमतीने निवड करण्यात येत आहे. सोमवारी (७ जुलै) या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे ते पक्षातील एकमेव नेते होते. भाजपाचे वरिष्ठ नेते सामल यांची ओडिशा भाजपा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. या निवडीची घोषणा पक्षाचे केंद्रीय निरीक्षक संजय जयस्वाल आज (८ जुलै) करतील अशी अपेक्षा आहे. कोण आहेत मनमोहन सामल? त्यांची सध्या इतकी चर्चा का? त्याविषयी जाणून घेऊयात.
उमेदवारीचा निर्णय सर्वसंमतीने
- भुवनेश्वर येथील पक्षाच्या मुख्यालयात वरिष्ठ भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनमोहन सामल यांच्या उमेदवारीचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
- २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला पहिल्यांदाच पूर्ण बहुमत मिळवून देण्यास त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याने आणि त्यांच्या राजकीय कौशल्यामुळे सामल यांना पुन्हा एकदा ओडिशा पक्ष युनिटचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले आहे.
- भाजपाने राज्यातील १४७ पैकी ७८ जागा जिंकल्या, तर बीजेडीला ५१ जागा मिळविण्यात यश आले.
बीजेडी सरकार कसे उलथवले?
सामल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही राज्यात विजय मिळवला आणि एकूण २१ पैकी २० जागा जिंकल्या. “भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने २०२४ च्या निवडणुकीसाठी बीजेडीशी युती करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र सामल हे एकमेव पक्ष नेते होते, ज्यांनी युती प्रस्तावाला विरोध केला आणि नेतृत्वाला एकटे लढण्यासही राजी केले,” असे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. मार्च २०२३ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सामल हे पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून आणि जनतेच्या भावना जाणून घेणारे नेते म्हणून उदयास आले आहेत. २००० पासून सलग पाचव्यांदा सत्तेत असणाऱ्या नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजेडी सरकारविरोधात असल्याचे दिसून आले आहे.
पक्षाच्या नेत्यांनी सांगितले, “सामल यांनी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांना बीजेडीशी युती न करण्याचे आणि आक्रमक प्रचाराने स्वबळावर निवडणूक लढवण्यास पटवून दिले. केंद्रीय नेतृत्वाला त्यांच्या प्रस्तावाशी सहमती दर्शवावी लागली आणि त्यामुळे बीजेडी सरकार उलथवून टाकण्यास त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. अशा प्रकारे राज्यात पहिल्यांदा भाजपाची सत्ता स्थापन झाली.”
मनमोहन सामल आहेत तरी कोण?
मनमोहन सामल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विद्यार्थी संघटना असलेल्या अभाविपमध्ये विविध पदांवर काम केले होते. भाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, प्रदेश पक्षाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती संघानेही मंजूर केली होती. १९९९ ते २००४ दरम्यान त्यांनी दोन वेळा भाजपाचे प्रदेश प्रमुख म्हणूनही काम केले होते. मजबूत संघटनात्मक कौशल्य असलेले आणि तळागाळातील नेते म्हणून मनमोहन सामल यांची ओळख आहे. मनमोहन सामल हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) आहेत. त्यांना एप्रिल २००० मध्ये भाजपाने राज्यसभेवर नामांकित केले होते. ते २००४ मध्ये भद्रकमधील धामनगर विधानसभा मतदारसंघातून ओडिशा विधानसभेवर निवडून आले आणि त्यानंतर त्यांना खासदारपद सोडावे लागले.
तत्कालीन बीजेडी-बीजेपी युती सरकारमध्ये, २००४ ते २००८ पर्यंत सामल यांनी महसूल आणि अन्न पुरवठा, तसेच ग्राहक कल्याण ही महत्त्वाची खाती सांभाळली. २००९ मध्ये बीजेडीने भाजपाशी असलेली युती तोडली. धामनगर हा मतदारसंघ अनुसूचित जाती (एससी) साठी राखीव करण्यात आल्यानंतर सामल यांनी आपला मतदारसंघ बदलला. त्यांनी २०१४ ची निवडणूक चांदबली जागेवरून लढवली, परंतु त्यांना अपयश आले.
ते त्यांच्या नवीन जागेवरून कोणतीही निवडणूक जिंकू शकले नाहीत. २०२४ च्या निवडणुकीतही त्यांना बीजेडी उमेदवाराकडून सुमारे १,९०० मतांनी पराभव पत्करावा लागला. मनमोहन सामल हे राज्यातील सर्व पक्षांशी असलेल्या त्यांच्या संबंधांसाठी ओळखले जातात. भाजपा वर्तुळात मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आणि पक्षात योग्य समन्वय सुनिश्चित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.