जळगाव – जिल्ह्यात महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये राष्ट्रवादीसह (शरद पवार) शिवसेनेतील (उद्धव ठाकरे) अनेक दिग्गजांनी प्रवेश केला असताना, काँग्रेसला इतके दिवस गळतीचे ग्रहण लागलेले नव्हते. उलट काँग्रेसमध्येच दुसऱ्या पक्षातून प्रवेश वाढले होते. परंतु, जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीवर डोळा ठेवून राजकीय डावपेच आखणाऱ्या भाजपच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे. काँग्रेसचे यावल तालुक्यातील काही जुने पदाधिकारी भाजपच्या गळाला लागल्याने काँग्रेस धास्तावली आहे.

महायुतीचे तिन्ही घटक पक्ष तिरंगा यात्रेतून आगामी निवडणुकांची पायाभरणी करत असताना, काँग्रेसनेही फैजपूरमध्ये माजी आमदार शिरीष चौधरी आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतर यावलमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश न करता थेट काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याने महायुतीचे नेते गोंधळात पडले होते. काँग्रेसची रावेर- यावल तालुक्यात ताकद वाढत चालल्याचे कारण भाजप आणि शिंदे गटाला समजत नव्हते. त्यामुळे, काँग्रेसला वेळीच रोखण्यासाठी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन तसेच आमदार अमोल जावळे यांनी व्यूहरचना आखली. दोघांनी सुमारे २९ वर्षे काँग्रेसचे यावलचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष राहिलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे, उद्योजक आर. जी. पाटील , जळगाव जिल्हा बँकेचे संचालक विनोद पाटील यांचेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गळाला लावले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सर्वांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेशही घडवून आणला.

अडचणीच्या वेळी यावल तालुक्याची धुरा सक्षमपणे सांभाळणारे प्रभाकर सोनवणे आणि आर. जी. पाटील यांच्यासारखे जुने निष्ठावान अचानक भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोन्ही मातब्बरांसमवेत यावल तालुका शेतकी सहकारी संघाचे अमोल भिरूड, सरपंच संघटनेचे प्रमुख संदीप सोनवणे तसेच रमजान तडवी, अनिल पाटील, पुंडलिक सावळे, आरती पाटील, मुबारक तडवी, योगेश कोळी, संदीप पाटील, मिनाक्षी पाटील, किरण तायडे, शेखर तायडे, सीताराम कोळी, लता पाटील, विनोद कोळी, प्रमोद सोनवणे, बाळू शिंपी आणि प्रवीण सोनवणे यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही गळती थांबविण्यासाठी आता काँग्रेसकडूनही प्रयत्नांना सुरुवात झाली आहे.