सातारा : शासनाने जाहीर केलेली ‘लाडकी बहीण’सह इतर योजना या फसव्या असून, शासनाकडे असलेला निधी आणि घोषित केलेल्या योजना यात खूप अंतर दिसत आहे. मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय चांगला आहे. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती पाहता त्यांनी जाहीर केलेल्या योजना संपूर्ण राज्यात लागू होण्याबाबत शंकाच असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. जकातवाडी (ता. सातारा) येथील एका कार्यक्रमानंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. या वेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने आदी उपस्थित होते. हेही वाचा >>> शरद पवार गटाला देणग्या स्वीकारण्याची मुभा; केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिलासा पवार म्हणाले, की सरकारचा अर्थसंकल्प झाल्यानंतर सहा महिन्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या जातात. मात्र, या वेळी राज्य सरकारने आठ दिवसांत पुरवणी मागण्या मांडल्या. त्यामुळे माझा असा अनुभव आहे, की राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना या फसव्या आहेत आणि त्या पूर्ण राज्यभर लागू होऊ शकत नाहीत. राज्यात लोकसभेप्रमाणेच धक्कादायक निकाल लागतील. सगळीकडे सरकारविरोधात वातावरण आहे. त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल. आम्हाला लोकसभेला तुतारी आणि पिपाणी या निवडणूक चिन्हांचा फटका बसला. साताऱ्यात विजय आमचाच होता. आमचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. मात्र, अनेक ठिकाणी तुतारीच्या विरोधात पिपाणी वाजवणारा माणूस निशाणी ठेवण्यात आली होती. त्याचा फटका आम्हाला बसला. मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण या प्रश्नावर ते म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारकडून आज विधानसभेचे कामकाज झाले नाही असे माझ्या वाचण्यात आले आहे. त्यामुळे काही निर्णय झाला नाही.