पुणे : जैन बोर्डिंग प्रकरणावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केल्यानंतर पुण्यात भाजप, शिवसेना (शिंदे) या महायुतीतील मित्रपक्षांमध्ये विसंवाद निर्माण झाला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्यानंतर माजी आमदार, शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी शांततेची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपने सुटकेचा नि:श्वास टाकला असतानाच आता आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे) पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याचे सांगत धंगेकर यांनी भाजपला पुन्हा खुले आव्हान दिले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने ‘मिशन १२५’चा नारा दिला असून, धंगेकर हे प्रमुख अडथळा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
धंगेकर यांनी जैन बोर्डिंग प्रकरणावरून मोहोळ आणि भाजपला लक्ष्य केल्याने त्याची दखल वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना घ्यावी लागली. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांची पाठराखणही केली. हे प्रकरण थंडावल्यानंतर आता धंगेकर यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपला आव्हान दिले आहे. महापालिका निवडणुकीत सर्व १६५ जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी तयारी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी अविनाश साळवे हे काँग्रेसमध्ये गेले. विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची अल्हाट, पल्लवी जावळे आणि संगिता ठोसर हे पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये गेले. पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि श्वेता चव्हाण हे तिघे शिवसेना (ठाकरे) पक्षात आहेत.
शिवसेना (शिंदे) पक्षाकडे शहराध्यक्ष प्रमोद उर्फ नाना भानगिरे हे एकच नगरसेवक आहेत. रवींद्र धंगेकर यांना महानगप्रमुख हे पद देण्यात आल्यानंतर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या अनेकजण संपर्कात आहेत. धंगेकर यांनी तत्कालीन शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस या तीन पक्षांत काम केले असल्याने त्यांचा जनसंपर्क आहे. पक्षवाढीसाठी त्यांनी नियोजनाला सुरुवात केली असून, सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये धंगेकर हे भाजपपुढे कसे आव्हान उभे करणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवसेना (शिंदे) पक्षही मागे राहणार नाही. महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात येत आहे. तरुण आणि सुशिक्षितांना उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर राहणार आहे. निवडणुका महायुतीद्वारे की स्वबळावर,याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेतील. मात्र, स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्यास त्यादृष्टीने पक्षाने तयारी सुरू केली आहे. रवींद्र धंगेकर, माजी आमदार, महानगरप्रमुख, शिवसेना (शिंदे)
