दापोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना कडून ‘ऑपरेशन टायगर’ राज्यात सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते रामदास कदम व गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का जाण्याची तयारी पूर्ण केली आहे. दापोली नगरपंचायतीत ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यावर अविश्वास ठराव मांडला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिंदेच्या शिवसेनेकडून अविश्वास ठराव आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता दापोलीत नगरपंचायतीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष बदल हे निश्चित झाले आहेत. शिंदेच्या शिवसेने कडून नगराध्यक्ष पदासाठी कृपा घाग तर उपनगराध्यक्ष पदासाठी विलास शिगवण यांचं नाव चर्चेत आहे. आता प्रशासनाकडून लवकरच बैठक आयोजित करण्यात आल्यानंतर हा ठराव पारित केला जाणार आहे.

१४ नगरसेवकांच्या गटप्रमुख शिवानी खानविलकर, नगरसेवक विलास शिगवण, अझीम चिपळूणकर व शहर प्रमुख पप्पू रेळेकर यांनी हे पत्र रत्नागिरीत येथे जाऊन जिल्हा प्रशासनाला दिले आहे. दापोली नगरपंचायतीत रामदास कदम व आमदार योगेश कदम यांना शह देण्यासाठी स्थापन केलेली सत्ता आता उलथून टाकण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. ठाकरे गट व शरद पवार गटाचे नगरसेवकांनी एकत्र येऊन १४ जणांचा एकत्र गट स्थापन करून चार दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या युवा नगरसेविका शिवानी खानविलकर यांच्याकडे या गटाचे नेतृत्व आहे. मात्र यामध्ये ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांचा समावेश नसून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.

शिंदेच्या शिवसेने कडून आता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी दोन नावे चर्चेत आहेत. नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यावर शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नगरसेविका कृपा घाग व शिवानी खानविलकर यांचं नाव चर्चेत आहे. नगराध्यक्षपद हे एक एक वर्षासाठी दिले जाऊ शकते. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले ज्येष्ठ कार्यकर्ते व नगरसेवक विलास शिगवण हे उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी या पदावर आपला दावा सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या दोन्ही पदांवर कोणाला संधी द्यायची याचा निर्णय शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम घेणार आहेत. त्यामुळे आता या बदलाकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena eknath shinde ramdas kadam dapoli nagar panchayat shivsena ubt mamata more motion of no confidence print politics news css