बीपीन देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औरंगाबाद : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) वतीने वाटप करण्यात येणाऱ्या तेरा हजार टॅबपैकी आठ हजारांवर टॅब अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप पोहोचलेलेच नाहीत. टॅबची वितरण प्रक्रिया रखडण्यामागचे कारण ओबीसी विकास तथा सहकारमंत्री अतुल सावे यांच्या या आठवड्याच्या शेवटी येणाऱ्या वाढदिवसाशी जोडले जात असून तसा आरोप आता महाज्योतीच्या माजी संचालकांकडून होत आहे.

ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धापूर्व प्रशिक्षणाबरोबर महाज्योतीने दोन वर्षापूर्वी जेईई, नीट व एमएच सीईटीचे मोफत आॅनलाईन प्रशिक्षण सुरू केले आहे. यामध्ये अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन उपरोक्त परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून १८ महिन्यांचे आॅनलाईन प्रशिक्षण मोफत दिले जाते. प्रशिक्षणासाठी मान्यवर विषयतज्ज्ञांची तासिका घेऊन टॅबमध्ये समाविष्ट करण्यात आली असून महाज्योतीच्या अद्ययावत ध्वनीमुद्रणालयातून मान्यवरांची तासिका चित्रित करण्यात आलेली आहे, असे काही माजी संचालकांकडून सांगण्यात आले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर टॅब वितरणाची व्यवस्था ढासळली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी ८२४ कोटी रुपये महाज्योतीच्या विविध विकास योजनांसाठी दिले होते. मात्र, सत्तांतरानंतर टॅब ओबीसी विद्यार्थ्यांना देवु नये, असा मनाई हुकुमच अतुल सावे यांनी काढल्याचा आरोपही होत आहे.

हेही वाचा… बच्चू कडू यांचे पुढील लक्ष्य नागपूर

अर्ध्यापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये वितरण

टॅब ही वैयक्तिक लाभाची योजना आहे. आचारसंहिता अन मॅक क्रमांकामुळे टॅबचे वितरण मध्यंतरी थांबले होते. सुरुवातीला पाच हजार टॅब होते. आपण पदभार स्वीकारल्यापासून साडे आठ हजारांवर टॅब मागवून त्याचे अर्ध्यापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये वितरितही करण्यात आले आहे. अमरावतीला झाले, २४ ला यवतमाळला वाटप होणार आहे. या विभागाच्या मंत्र्यांनी टॅबचे वितरण थांबवू नये, अशा सूचना दिलेल्या आहेत. सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडून टॅब वाटप होते. – राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती, नागपूर.

हेही वाचा… भाजपशी मैत्री केलेल्या अन्य प्रादेशिक पक्षांसारखीच शिवसेनेची अवस्था होणार का ?

विद्यार्थ्यांच्या परीक्षेपूर्वीच टॅब वाटप करणे आवश्यक होते. मात्र ओबीसी मंत्री अतुल सावे यांचा वाढदिवस असल्याने हे त्या दिवशी टॅब वाटप केले जाणार आहे. सरकारला विद्यार्थ्यांना देशातील सर्वोच्च परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळवून द्यायचे आहे की मंत्र्यांच्या वाढदिवसासाठी महाज्योतीला इव्हेंट करायचे आहे. शिंदे-फडणवीस सरकारने अशा इव्हेंट करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या मंत्र्यांना लगाम घालावी. – प्रा. दिवाकर गमे, माजी संचालक, महाज्योती

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students have to wait for birthday of minister about tab distribution in aurangabad district print politics news asj