संतोष प्रधान

दक्षिणेकडील राज्ये प्रादाक्रांत करण्याकरिता भाजपने भर दिला असतानाच कर्नाटकातील पराभवाने या वर्षाअखेर होणाऱ्या तेलंगणा राज्यात सत्ता संपादन करण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असेल. दक्षिण भारतात भाजपला अजून संधी नाही हा संदेश मात्र कर्नाटकच्या पराभवाने गेला आहे.

भाजपला हिंदी पट्टा, ईशान्येकडील राज्ये वा पश्चिमेकडील राज्यांमध्ये सत्ता मिळाली असली तरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये अपेक्षित यश अद्यापही मिळू शकलेले नाही. दक्षिणेकडील राज्यांपैकी केरळच्या निवडणुकीत भाजपची पाटी कोरी राहिली. तमिळनाडूत अण्णा द्रमुकच्या मदतीने भाजपचे चार उमेदवार निवडून आले. पुड्डेचरीमध्ये स्थानिक नेते रंगास्वामी यांच्याशी युती करून भाजप सत्तेत असला तरी ते फारच छोटे राज्य आहे. आंध्र प्रदेशातही पक्षाला अद्याप जोर धरता आलेला नाही. कर्नाटकात पक्षाची सत्ता होती तर तेलंगणावर भाजपने सारे लक्ष केंद्रित केले आहे.

आणखी वाचा-Karnataka Election 2023 : राष्ट्रवादी, आप पक्षाला मतदारांनी नाकारलं… ‘नोटा’पेक्षा मिळाली कमी मतं!

तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला पराभूत करण्यासाठी भाजपने गेली दोन वर्षे सारी ताकद लावली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमघ्ये घेण्यात आली होती. तेव्हा मोदी यांनी तेलंगणाचा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला होता. के. चंद्रशेखर राव यांचे आधी भाजपशी चांगले संबंध होते. राज्यसभेत राव यांच्या पक्षाने तेव्हा अल्पमतात असलेल्या भाजपला मदतही केली होती. हैदराबाद महापालिका निवडणुकीतील यशानंतर भाजपला तेलंगणात संधी वाटू लागली. त्यातूनच पुढे भाजप आणि चंद्रशेखर राव यांच्यात खटके उडू लागले. केंद्र सरकारने भात खरेदी बंद करून चंद्रशेखर राव यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. चंद्रशेखर राव यांनीही मग भाजपशी दोन हात करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्ष- दीड वर्षात पंतप्रधान मोदी हैदराबाद दौऱ्यावर आले असता त्यांच्या स्वागताला जाण्याचेही चंद्रशेखर राव यांनी टाळले होते. आता तर चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांना दिल्लीतील मद्य घोटाळाप्रकरणी ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे. कदाचित विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांना अटक केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जाते.

आणखी वाचा-Karnataka Election 2023 : ७ टक्के मते आणि ७० जागांचा फरक! ‘या’ कारणामुळे काँग्रेसचा विजय; पण भाजपाला कोणत्या प्रदेशात फटका? जाणून घ्या… 

कर्नाटकातील पराभवाने मात्र तेलंगणातील उत्साहावर परिणाम होणार आहे. कर्नाटक जिंकले असते तर आता दक्षिण भारत पादाक्रांत करणार अशी भाजपने निर्धार व्यक्त केला असता. कर्नाटकातील पराभवाचे साहजिकच परिणाम शेजारील तेलंगणात पडणार आहेत. अर्थात दोन्ही राज्यांमधील मुद्दे वेगळे असले तरी भाजप दक्षिण भारत जिंकू शकत नाही, असा संदेश कर्नाटकच्या पराभवाने गेला आहे. कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्याने तेलंगणामधील काँग्रेसमधील मरगळ दूर झाली आहे. ‘कर्नाटकच्या यशामुळे तेलंगणात काँग्रेस चांगली कामगिरी करेल, असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार रेवंथ रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.