अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातील रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देण्‍यात वंचित बहुजन आघाडीने केलेला उशीर ते आता पक्षात पडलेली उभी फूट कुणाच्‍या पथ्‍यावर पडणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवरून सुरुवातीपासूनच गोंधळ पहायला मिळाला. आघाडीने प्राजक्‍ता पिल्‍लेवान यांना उमेदवारी घोषित केली होती. दरम्‍यान, आनंदराज आंबेडकर यांनी २ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरला. त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा अपेक्षित होता. तो मिळत नसल्याचे पाहून त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली. पण, त्‍यानंतर लगेच वंचित बहुजन आघाडीने उमेदवार रिंगणात न उतरविण्याचा निर्णय घेऊन आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला. तरीही पत्र लिहून आपण निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा – कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?

नामांकन दाखल करण्याच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्‍या पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमधील स्थानिक कार्यकर्त्यांना माझ्या रॅलीमध्ये कोणीही सहभागी होऊ नका, अशी फोनद्वारे सुचना वजा ताकीद दिली होती, असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला होता. त्‍यानंतर सारवासारव करीत वंचित बहुजन आघाडीने आपण अर्ज मागे घेऊ नये आणि उमेदवारी कायम ठेवावी, अशी विनंती आनंदराज आंबेडकर यांना केली होती. तरीही आंबेडकर माघारीवर ठाम होते. पण, त्‍यानंतर वेगवान घडामोडी घडल्‍या आणि आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक लढण्‍याचा निर्णय घेतला. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने त्‍यांना पाठिंबा जाहीर केला. आंबेडकर यांनी प्रचारही सुरू केला. शुक्रवारी रात्री येथील सायन्‍सकोर मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. या सभेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तीनही नातू प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे उपस्थित राहणार असल्‍याचे सांगण्‍यात आले, पण प्रकाश आंबेडकर हे अनुपस्थित होते. त्‍यांच्‍या अनुपस्थितीची वेगळी चर्चा सुरू झाली. त्‍यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्‍हाध्‍यक्ष शैलेश गवई अंजनगाव सुर्जी तालुका अध्‍यक्ष सुनील राक्षस्‍कर, महिला आघाडीच्‍या शहराध्‍यक्ष भारती गुडधे, महिला आघाडीच्‍या सचिव रेहना खान, सरचिटणीस मेराज खान यांनी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला. त्‍यामुळे या पाचही जणांना पक्षातून बडतर्फ करण्‍यात आले. वंचित बहुजन आघाडीतील ही उभी फूट कुणाच्‍या पथ्‍यावर पडणार याची चर्चा आता रंगली आहे.

हेही वाचा – इंडिया आघाडी जिंकली तर नेतृत्व कोण करणार? मल्लिकार्जुन खरगेंनी केला खुलासा

आंबेडकरी समाजाचे मतविभाजन अशक्‍य

या निवडणुकीत विविध आंबेडकरी संघटनांची एकजूट पहायला मिळत आहे. आंबेडकरी समाजात मतविभाजन घडवून आणण्‍याचा काही जणांचा प्रयत्‍न सुरू असला, तरी तो होणार नाही. – प्रा. प्रदीप दंदे, समन्‍वयक, आंबेडकराईट सोशल फोरम.