काँग्रेसचे ८५वे अधिवेशन छत्तीसगढची राजधानी रायपूर येथे सुरू झाले आहे. या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात प्रामुख्याने २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनिती, पक्षासमोर आव्हानं, विरोधकांच्या एकजुटीचा मुद्दा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय काँग्रेसचे नवनियुक्त पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. याशिवाय, काँग्रेस कार्यकारिणी समिती निवडणुकीबाबतही निर्णय घेण्यात येणार होता, त्यानुसार ही निवडणूक होणार नसल्याचे आता ठरले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस नेतृत्वाने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस कार्यकारिणी समितीची निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षाच्या संचालन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ज्यामध्ये गांधी कुटुंबातील सदस्यांनी सहभाग घेतला नाही. संचालन समितीची ही बैठक जवळपास तीन तास सुरू होती.

पक्षांतर्गत बंडखोरी संपली असली तरी, तत्कालीन ‘जी-२३’ नेत्यांनी पक्षाध्यक्षपद, कार्यकारिणी समिती आणि संसदीय मंडळातील सदस्यांची पदे भरण्यासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार, पक्षाध्यक्षपदाची निवडणूक घेऊन मल्लिकार्जुन खरगे हे गांधीतर पक्षाध्यक्ष बनले.

पक्ष कार्यकारिणीमधील २३ सदस्यांपैकी १२ सदस्यांची निवडणुकीद्वारे निवड होते, बाकी १३ सदस्य पक्षाध्यक्ष नियुक्त करतात. पक्षाध्यक्ष हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात व संसदीय पक्षाच्या अध्यक्षांना स्थान दिले जाते. त्यामुळे सोनिया गांधीही कार्यकारिणीवर असतील. संसदीय मंडळ अस्तित्वात नसल्यामुळे कार्यकारिणी समिती हीच निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे. तिथे निवडणुकीतून गांधी निष्ठावान नसलेले सदस्यही निवडून येऊ शकतात. पक्षाध्यक्षपद गांधीतर व्यक्तीकडे गेले असून समितीवरही गांधीतर सदस्य येऊन निर्णय घेऊ लागले तर पक्षावरील गांधी निष्ठावानांची पकड सैल होण्याची भीती असल्याने कार्यकारिणी समितीची निवडणूक न घेण्याकडे कल असल्याचा दावा काही ज्येष्ठ नेते अगोदरच करत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There will be no election of the congress working committee decision on the first day of session in raipur msr