Tirupati Balaji Temple Donation Box Scam : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात भेसळ असल्याचा मुद्दा वर्षभरापूर्वी गाजला होता. या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता मंदिरातील दानपेटीतील देणग्यांची चोरी झाल्याच्या आरोपावरून पुन्हा नवा वाद उभा राहिला आहे. आंध्रप्रदेशमधील भाजपा आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीबरोबर सत्तेत असलेल्या तेलुगू देसम पार्टीने हा आरोप केला आहे. राज्यात वायएसआर काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी मंदिरातील दानपेटीतून कोट्यवधी रुपयांची चोरी झाल्याचे टीडीपीने म्हटले. या कथित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी विशेष तपास पथकाची स्थापना केली. दुसरीकडे वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने मात्र आरोपांचे खंडन केले असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारकडे सीबीआय तपासाची मागणी केली.

दानपेटीतून १०० डॉलरच्या नोटा चोरल्याचा आरोप

तिरुपती बालाजी मंदिरातील दानपेटीतील घोटाळ्याचे हे प्रकरण एप्रिल २०२३ मधील आहे. त्यावेळी राज्यात जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस पक्षाचे सरकार होते. या प्रकरणात तिरुमला देवस्थानाचे माजी कर्मचारी रविकुमार यांच्यावर दानपेटीतून १०० डॉलरच्या नऊ नोटा चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश यांनी २० सप्टेंबर रोजी या घटनेचे कथित सीसीटीव्ही फुटेज शेअर केल्यानंतर या प्रकरणाने पुन्हा जोर पकडला आहे. लोकेश यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि तिरुमला मंदिर समितीचे माजी अध्यक्ष भुमाना करुणाकर रेड्डी यांच्यावरही १०० कोटी रुपयांची चोरी केल्याचा आरोप केला आहे.

दानपेटीतील कथित चोरीचे सीसीटीव्ही फुटेज शेअर

नारा लोकेश यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून मंदिराच्या दानपेटीतील पैशांच्या कथित चोरीचे सीसीटीव्ही फुजेट शेअर केले. “जगन मोहन यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असताना राज्यातील भ्रष्टाचार सर्वोच्च स्थानी होता. त्यांनी तिरुमला येथील भगवान वेंकटेश्वरालाही सोडले नाही. करुणाकर रेड्डी यांच्या आशीर्वादाने काहीजणांनी मंदिरातील दानपेटीतून कोट्यवधी रुपयांची लूट केली. चोरलेल्या रक्कमेची रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यात आली. करुणाकर रेड्डी हे देवस्थानाचे अध्यक्ष असताना रविकुमार यांनी दानपेटीतील शेकडो कोटी रुपयांची चोरी केली. त्याच्या साथीदारांनी तर हे प्रकरण लोक अदालतमध्ये मिटवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, दानपेटीतील चोरीचे व्हिडिओ आज सर्वांसमोर आले आहेत. लवकरच आरोपी स्वतः चोरीची कबुली देऊन वायएसआर काँग्रेस पक्षाच्या पापांचा संपूर्ण हिशेब उघड करतील,” असे लोकेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

आणखी वाचा : NDA Seat Sharing Bihar : बिहारमध्ये नितीश कुमारच मोठा भाऊ? एनडीएचे सूत्र ठरले; भाजपा किती जागा लढवणार?

तिरुपती मंदिर प्रशासनाने काय म्हटले?

मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीचा वाद वाढल्यानंतर देवस्थान प्रशासनानेही आपली भूमिका स्पष्ट केली. चोरीचे हे आरोप राजकीय सूडबुद्धीचे असूच शकत नाही. कारण- कोट्यवधी भाविकांचा त्यावर विश्वास असल्याचे देवस्थानचे विद्यमान सदस्य व भाजपा नेते जी. भानुप्रकाश रेड्डी यांनी म्हटले. त्यावेळच्या मंदिर प्रशासनातील सदस्यांची ही गंभीर चूक आहे. रविकुमार यांच्याविरोधातील गुन्हे समेट करण्यायोग्य नसतानाही लोक अदालतीमध्ये हे प्रकरण मिटवण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला होता. या चोरीचा वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वायएसआर काँग्रेसमधील नेतृत्वालाच मोठा फायदा झाला, असे भानुप्रकाश यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३७९ आणि ३८१ अंतर्गत चोरीसंबंधित गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे फक्त न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरच मागे घेतले जातात, असेही ते म्हणाले.

पोलिसांनी दबाव टाकल्यामुळेच तडजोड?

भानुप्रकाश रेड्डी यांनी २५ जुलै २०२४ रोजीचे तत्कालीन मंदिर समितीचे सतर्कता व सुरक्षा अधिकारी एम. गिरीधर राव यांचे पत्रही दाखवले. “या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यावेळचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी वाय. सतीश कुमार यांच्यावर पोलिसांनी प्रचंड दबाव आणला होता. त्याच दबावाखाली सतीश कुमार आणि आरोपी रविकुमार यांच्यात तडजोड घडवून आणली गेली, असा आरोपही भानुप्रकाश रेड्डींनी केला. मंदिर प्रशासनाच्या सहायक दक्षता आणि सुरक्षा अधिकाऱ्यावर पोलिसांनी दबाव का टाकला हे माहीत नाही. मात्र, सतीश कुमार हे प्रामाणिक, मेहनती व निष्ठावान अधिकारी असून तिरुपती मंदिराच्या कामाशी त्यांची खोल बांधिलकी आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले होते.

दानपेटीतील चोरी करताना रंगेहाथ पकडलं

२९ एप्रिल २०२३ रोजी सतीश कुमार यांनी रविकुमार यांना मंदिरातील दानपेटीतून चोरी करताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रविकुमार यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम ३७९ आणि ३८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात ३० मे २०२३ रोजी तिरुपती न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये एका लोक अदालतमध्ये हे प्रकरण निकाली काढण्यात आले. त्यावेळी सतीश कुमार आणि रवी कुमार यांनी प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तडजोड केल्याचे सांगितले होते. गेल्या वर्षी १० सप्टेंबर रोजी एम. श्रीनिवासुलू नावाच्या एका व्यक्तीने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून दानपेटीतील पैशांच्या कथित घोटाळ्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली होती. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत लोक अदालतीचा निर्णय स्थगित केला आहे.

हेही वाचा : Voter Verification Portal : राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ऑनलाइन प्रक्रियेत केले बदल, कारण काय?

वायएसआर काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी

वायएसआर काँग्रेस पक्षाचे तिरुपती लोकसभा मतदारसंघाचे खासदार मडीला गुरुमूर्ती यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात खासदार गुरुमूर्ती म्हणाले, “सध्याचे आंध्र सरकार ठोस पुरावे आणि योग्य निष्पक्ष तपास करण्यापूर्वीच वायएसआर काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करीत आहे. हे आरोप राजकीय सुडापोटी केली जात आहे. अशा कृतींमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेलाच धोका निर्माण होऊन लोकांचा लोकशाहीवरील विश्वासही डळमळीत होतो. या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी केंद्रीय संस्थेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे.” दरम्यान, राज्य सरकारने सोमवारी विशेष तपास पथकाची स्थापना केल्यानंतर या प्रकरणात कोणकोणते खुलासे होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.