छत्रपती संभाजीनगर – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून नाव नोंद असलेल्या वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात गेला आहे. केजपूर्वी परळीत घडलेल्या मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे व पिग्मी एजंट महादेव मुंडे या दोघांच्या खून प्रकरणातही वाल्मिकचाच हात असल्याचा थेट आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या दोन खुनासह संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या या तिन्ही घटना सहा ते आठ महिन्यांच्या अंतराने घडल्या आहेत.

२० ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे यांची निर्जन ठिकाणी नेऊन निर्घृण हत्या करण्यात आली होती. तर जून २०२४ मध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा सायंकाळच्या सुमारास परळीतील बँक कॉलनी भागात गोळी झाडून खून करण्यात आला होता.

परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणानंतर त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मागच्या आठवड्यात बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा तर इतर कुटुंबीयांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपचारानंतर माध्यमांसमोर बोलताना पुन्हा एकदा थेट वाल्मिक कराडचे नाव घेतले. वाल्मिकनेच बंगल्यावरून फोन केल्यामुळेच आपल्या पतीच्या खून प्रकरणाचा तपास थंडावला, असा आरोप केला.

मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे खून प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या महादेव गिते याने वाल्मिकनेच आम्हाला अडकवल्याचे म्हटले आहे. गित्ते याला दोन दिवसांपूर्वी न्यायालयात हजर करण्यात आले होते तेव्हा त्याने पोलिसांच्या मोठ्या गाडीतूनच वाल्मिकचे नाव घेतले. महादेव गिते याने बापू आंधळे खून प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव ३०७ मधून पोलिसांनीच वगळले आहे, परंतु १२० ब मध्ये नाव असल्याचा आरोप केला आहे. तर महादेव गिते यांच्या पत्नी मीरा गित्ते यांनी बापू आंधळे खून प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव असताना त्याचे नाव गुन्ह्यातून हटवण्यात आले आहे, असा थेट आरोप केला. वाल्मिकने आमच्यासारख्या अनेकांची लेकरे रस्त्यावर आणली असून, प्रशासनाने आणि सरकारनेही बापू आंधळे खून प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करावा, अशी मागणी केली आहे. सरकारवरही लाडक्या बहिणीच्या योजनेवरून टीकास्त्र सोडले. सरकारच्या लाडक्या बहिणी विधवा होत असून त्यांचे कुंकू पुसले जात आहे, असा आरोप मीरा गित्ते यांनी केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक

कराड याचे नाव सूत्रधार म्हणून समोर आले. संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजले. आका म्हणून वाल्मिकची गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर नवी कुख्यात ओळख झाली. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर त्यातील आरोपींनी वाल्मिक कराडशी संवाद साधला होता. त्याच्या काही अगोदर वाल्मिक कराडने केजला जाऊन हत्या करणाऱ्या सहकाऱ्यांशी एका हॉटेलमध्ये संवाद साधले, याची चित्रफित प्रसारित झाली होती. सोबत एक पोलीस उपनिरीक्षकही होता. ज्याला पुढे निलंबित करण्यात आले.

सलग तीन खुनाच्या घटनांमध्ये वाल्मिक कराडचे नाव केंद्रस्थानी आल्याने त्याचा पाय अधिकच खोलात जात आहे. कराडने संतोष देशमुख हत्याप्रकरणामध्ये त्याच्यावर लावलेले आरोप हटवून दोष मुक्तीसाठी बीड जिल्हा न्यायालयामध्ये यापूर्वीच अर्ज केले आहे. परंतु आता आणखी दोन खुनांमध्येही वाल्मिकचे नाव आल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.