हरियाणामधील नूह जिल्ह्यात ब्रिजमंडळ जलाभिषेक मिरवणुकीदरम्यान हिंसा घडून तीन जणांचा मृत्यू झाला. हिंसाचारावरून प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. त्यातच आता भाजपाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनीही याबाबत परखड भाष्य केले आहे. “धार्मिक यात्रेत शस्त्र नाचवणे योग्य नाही; तसेच दोन्ही गटांकडून एकमेकांना चिथावणी दिली गेली. मिरवणुकीत नाचवण्यासाठी त्यांना शस्त्रे कुणी दिली होती? धार्मिक यात्रेत कुणी तलवार किंवा लाठ्या-काठ्या घेऊन जातो का? हे पूर्णपणे चुकीचे आहे. या बाजूनेही चिथावणी दिली गेली आहे. तसेच त्या बाजूच्याही लोकांनी चिथवाणी दिलीच नाही, असे मी म्हणणार नाही”, अशी प्रतिक्रिया राव इंद्रजित सिंह यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली. यासोबतच त्यांनी सांगितले की, मिरवणुकीच्या वेळी लहान मुलांमध्ये छोटेसे भांडण झाले होते. त्यांनी एकमेकांवर दगड फेकले. हे कारण निमित्त ठरले आणि त्याचा मोठा भडका उडाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नूह जिल्ह्यातील पोलिस प्रशासन कुचकामी ठरल्याचे लक्षात आल्यानंतर राव इंद्रजित सिंह यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती करून केंद्रीय सुरक्षा दलाची मदत मागितली आहे. ते पुढे म्हणाले, “सोशल मीडियातील पोस्टमुळे लोकांमध्ये नकारात्मकता पसरली आहे. सोशल मीडियावर चिथावणीखोर व्हिडीओ कुणी पोस्ट केले, याची चौकशी करावी, अशी सूचना मी पोलिसांना दिली आहे. या व्हिडीओमध्ये कुणीतरी बोलत आहे की, ‘आम्ही या धार्मिक यात्रेद्वारे तुमच्याकडे येत आहोत. तुम्ही आम्हाला थांबवू शकत असाल, तर थांबवा.’ जर असे बेजबाबदार व भडकावू व्हिडीओ अपलोड केले गेले, तर त्याचा नकारात्मक परिणाम होणारच.”

हरियाणामध्ये हिंसाचार का भडकला? गोरक्षक मोनू मानेसरशी त्याचा काय संबंध?

नूह जिल्ह्यात ज्या ठिकाणी हिंसाचार उसळला, त्या भागात मुस्लिमबहुल वस्ती आहे. पण, मागच्या ७५ वर्षांमध्ये येथे एकदाही असा प्रसंग घडला नाही. भारताची फाळणी झाली, तेव्हाही या भागात शांतता होती. मग आजच काय झाले, असा प्रश्न उपस्थित करून राव इंद्रजित सिंह म्हणाले की, याला सोशल मीडिया जबाबदार आहे, असे माझे मत आहे. राव इंद्रजित सिंह यांनी फेब्रुवारी २०२३ रोजी भिवानी जिल्ह्यात नासीर व जुनैद या दोन मुस्लिम युवकांच्या झालेल्या हत्येबद्दलही खेद व्यक्त केला होता. (जुनैद व नासीर हे दोघेही राजस्थानमध्ये राहणारे होते. गाईंची तस्करी करीत असल्याच्या संशयावरून त्यांची हत्या करण्यात आली) अशा घटनांमुळे एका विशिष्ट समाजामध्ये छळ होत असल्याची भावना निर्माण होत आहे.

राव इंद्रजित सिंह हे काँग्रेसचे माजी नेते आहेत. २०१४ साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मागच्या नऊ वर्षांपासून ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. राव यांचे समर्थक त्यांना २०२४ साठी हरियाणाचा मुख्यमंत्रीपदाचा संभाव्य चेहरा असल्याचे मानतात. राव यांनी पक्षाला यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे; पण पक्षाने त्यांना साजेशी जबाबदारी दिलेली नाही. ऑक्टोबर २०२१ साली राव इंद्रजित सिंह यांना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून वगळण्यात आले.

हरियाणाच्या हिसार जिल्ह्याचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांनीही नूह आणि आजूबाजूच्या परिसरात उसळलेल्या हिंसाचारामागील षडयंत्रावर टीका केली. जात, धर्म यांचा विचार न करता, आम्ही या देशातील सर्वाधिक शांतताप्रिय असणारे लोक आहोत. या ठिकाणी एकमेकांमध्ये असलेला बंधुभाव अतिशय चांगला आहे. मात्र, मागच्या काही दिवसांत कटकारस्थाने आखली गेल्यामुळे या ठिकाणची शांतता भंग झाली आहे, अशी प्रतिक्रिया चौधरी बिरेंद्र सिंह यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली.

बिरेंद्र यांचे सुपुत्र ब्रिजेंद्र सिंह हे भाजपा नेते व हिसारचे विद्यमान खासदार आहेत. २०२० साली तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला ब्रिजेंद्र सिंह यांनी पाठिंबा दिला होता. कालांतराने तीन कृषी कायदे रद्द करण्यात आले होते.

फरिदाबादचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री क्रिष्णन पाल गुर्जर म्हणाले की, हा दुर्दैवी प्रकार घडायला नको होता. काही लोक मागच्या साडेआठ वर्षांपासून (भाजपाचा कार्यकाळ) हरियाणामधील एकोपा, शांतता व सांप्रदायिक सद्‌भावना नष्ट करण्याचे काम करीत आहेत. असे गैरप्रकार टाळण्यासाठी गुप्तचर यंत्रणा आणखी बळकट करण्याची गरज असल्याचेही गुर्जर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who gave weapons to the religious yatris at nuh ask union minister rao inderjit singh kvg