Vande Mataram controversy: जयपूरमध्ये झालेल्या एका शिक्षक सत्कार कार्यक्रमात राजस्थानचे आमदार बाल मुकुंद आचार्य यांनी एका व्यक्तीला वेगळाच प्रश्न विचारला. वारंवार ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ म्हणण्याच्या इच्छेबाबत त्यांनी एका उपस्थित व्यक्तीला प्रश्न विचारले. हा प्रश्न विचारतानाचा व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच जयपूरच्या वैशाली नगरातील एका हॉटेलमध्ये हिंदुस्तान बुक ऑफ रेकॉर्ड्स आयोजित एका खासगी कार्यक्रमात घडली. देशभरातील शाळांच्या अधिकाऱ्यांसह १००हून अधिक शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान बाल मुकुंद आचार्य यांनी मंचावरून ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ अशी घोषणाबाजी केली. घोषणा केल्यानंतर उपस्थित सर्व लोक या घोषणेत सहभागी झाले आणि आचार्य यांनी त्यावेळी एका व्यक्तीकडे बोट दाखवत विचारले की, तो घोषणेत सामील का होत नाही. त्यावेळी एकमेकांना प्रतिउत्तरं देताना त्यांचा वाद विकोपाला जातो की काय अशी शंका उपस्थितांना आली.

नेमका वाद काय झाला?

“भाऊ, तुम्ही बाहेरून आलात का? उभे राहा. तुम्ही ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ का म्हणत नाही? हे म्हणण्यात तुम्हाला काही अडचण आहे का? तुम्ही कुठून आलात?” असे प्रश्न हवामहालचे आमदार बाल मुकुंद आचार्य यांनी त्या व्यक्तीला विचारले.

आचार्य यांनी प्रश्न विचारलेल्या तरूणाने त्याचे नाव मोहम्मद आसिफ असल्याचे सांगत तो महाराष्ट्रातून आल्याचे सांगितले. तसंच ‘वंदे मातरम्’ म्हणण्यात त्याला काहीच हरकत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. असं असताना आचार्य यांनी पुन्हा त्याला प्रश्न विचारले. “तुमचं देशावर प्रेम नाही का? ‘वंदे भारत’ म्हणजे काय माहीत आहे का? म्हणजे मी माझ्या भारतमातेला वंदन करतो. तुम्हाला भारतावर विश्वास नाही का? तिरंग्यावर नाही का? कसे लोक आहेत हे?” असे आचार्य यांनी पुन्हा म्हटले. यावर आसिफ यानेही आचार्य यांना प्रत्युत्तर दिले की, “त्याला देशावर पूर्ण विश्वास आहे.” मात्र, आचार्य यांनी त्यांच्यावर देशनिष्ठा नसल्याचा आरोप करत म्हटले की, “काही लोक देशाचं मीठ खातात, देशात राहतात, मात्र देशाच्या विरोधात बोलतात. ही त्यांची मानसिकता आहे आणि हे तुम्हाला समजायला हवं.”

आचार्य यांच्या या बोलण्यामुळे आसिफ याच्या शेजारी बसलेले एक शिक्षक उभे राहून आचार्य यांना उत्तर देऊ लागले. ते म्हणाले की, “आम्ही दिवसातून पाचवेळा नमाज पढतो आणि अखेर या मातीतच दफन होतो. मग आम्ही याचा आदर करत नाही असं तुम्ही कसं म्हणता? देशात अनावश्यक धार्मिक तणाव का निर्माण करता? आम्हीही या भूमीशी निष्ठावान आहोत. आमच्या प्रामाणिकपणावर प्रश्न कसा उपस्थित करू शकता?”

दरम्यान, हा वाद चिघळत असल्याचे लक्षात येताच आयोजकांनी उपस्थितांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि लगोलग कार्यक्रमही आटोपता घेतला.
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आचार्य यांनी सांगितले की, “हा कार्यक्रम सुमारे १० दिवसांपूर्वी झाला. मला शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मी फक्त त्या व्यक्तीला आणि इतर काही जणांना विचारले की, ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ का म्हणत नाही. एका बाजूला ते म्हणतात की संविधान सर्वोच्च आहे आणि दुसऱ्या बाजूला मातृभूमीचे कौतुक करायलाही तयार नाहीत.”

कोण आहेत बालमुकुंद आचार्य?

बालमुकुंद आचार्य हे राजस्थान विधानसभेत हवामहल मतदारसंघाचे आमदार आहेत. २०२३पासून ते भाजपामध्ये कार्यरत आहेत. ते धार्मिक नेतृत्वही करतात आणि राजकीय कारकीर्दही पाहतात. २०२३च्या विधानसभा निवडणुकीत हवामहल मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. याआधीदेखील आचार्य हे अनेक मुद्द्यांवरून चर्चेत होते.

२०२३मध्ये निवडून येताच आचार्य यांनी हवामहल परिसरातील मांसाहारी पदार्थांवर तातडीने बंदी आणली. त्यांनी मस्जिद परिसरात प्रवेश करत तिथे पाकिस्तान मुर्दाबाद असे पोस्टरही लावले होते आणि जय श्रीराम अशी घोषणाबाजी केली होती. यावरून बराच वाद झाला होता. मुस्लीम समुदायाने याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आचार्य यांचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते एका पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसल्याचे दिसत होते. यावर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्यावर टीका करत लोकतंत्राचा अपमान केल्याचा आरोप केला होता.