Jagdeep Dhankhar News Today : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (२१ जुलै) अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. उपराष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतर धनखड सार्वजनिक जीवनापासून दूर होते. इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी त्यांच्याबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणाचाही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे ते बेपत्ता झाल्याचा दावा विरोधकांनी केला. यादरम्यान- धनखड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. राजीनाम्याच्या एका महिन्यानंतर त्यांनी उपराष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज (सोमवार) संध्याकाळी ते दिल्लीतील छतरपूर येथील अभय सिंह चौटाला यांच्या फार्महाऊसमध्ये राहायला जाणार आहेत.

धनखड यांच्या या निर्णयामागे जवळपास ४० वर्षांची जुनी राजकीय व वैयक्तिक नाळ आहे. अभय सिंह चौटाला हे इंडियन नॅशनल लोकदलाचे (INLD) प्रमुख आहेत. गेल्या चार दशकांपासून त्यांचे धनखड कुटुंबीयांबरोबर चांगले संबंध आहेत. १९८९ मध्ये अभय यांचे आजोबा व हरियाणातील जाट समुदायाचे नेते देवीलाल यांनी धनखड यांच्यामध्ये भविष्यातील नेतृत्व पाहिलं होतं. तेव्हापासून धनखड यांनी देवीलाल यांनाच आपलं राजकीय गुरू मानलं. ‘दी इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना अभय चौटाला म्हणाले, “मला जेव्हा समजले की- धनखडजी राहण्यासाठी घर शोधत आहेत, तेव्हा मी त्यांना फोन करून आमच्या घरी राहण्याची विनंती केली. आम्ही त्यांना आमचे वडीलधारे मानतो, त्यामुळे ही एक कौटुंबिक आपुलकी आहे. मी त्यांना सांगितले की- पर्यायी निवास शोधण्याची गरज नाही; हेच त्यांचे स्वतःचे घर आहे. त्यांनी आमचं निमंत्रण सन्मानाने स्वीकारलं आहे.”

धनखड चौटाला कुटुंबाशी कसे जोडले गेले?

१९८९ पासून जगदीप धनखड हे चौटाला कुटुंबाशी जोडले गेले. त्यावर्षी २५ सप्टेंबरला हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवीलाल यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील इंडिया गेटजवळील बोट क्लबवर विरोधकांची मोठी सभा झाली होती. या सभेसाठी राजस्थानमधून तब्बल ५०० वाहने आणण्याची जबाबदारी धनखड यांनी पार पाडली. या यशस्वी मेळाव्यामुळे देवीलाल यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीला काँग्रेसविरोधी लढ्यात मोठा आत्मविश्वास मिळाला. त्यानंतर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता दलाची स्थापना केली आणि लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत देवीलाल यांनी धनखड यांना झुंझुनू मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि स्वतः त्यांच्या प्रचारात सहभागी झाले. निवडणुकीच्या निकालाने त्यांच्या नात्यातील जवळीक अधिकच बळकट झाली.

आणखी वाचा : Jagdeep Dhankhar Pension : जगदीप धनखड यांचं निवृत्ती वेतन कशामुळे बंद? कारण काय?

देवीलाल यांच्या समर्थनार्थ धनखड यांचा राजीनामा

काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर जनता दलाच्या सरकारमध्ये देवीलाल उपपंतप्रधान झाले, तर धनखड यांची केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. मात्र, लवकरच देवीलाल आणि पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्यातील संबंध बिघडले. १९९० मध्ये जेव्हा सिंह यांनी देवीलाल यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलं, तेव्हा जाट नेत्याच्या समर्थनार्थ केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा देणारे धनखड हे एकमेव मंत्री होते. त्यानंतर जनता दलाचे सरकार कोलमडले आणि व्ही. पी. सिंह यांच्या जागी चंद्रशेखर पंतप्रधान झाले. त्यावेळी देवीलाल पुन्हा उपपंतप्रधान करण्यात आलं आणि धनखडही केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून परत आले.

जनता दलाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश

जनता दलाचे सरकार कोसळल्यानंतर जगदीप धनखड यांनी जनता दलाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर देवीलाल यांनी इंडियन नॅशनल लोक दलाची (INLD) स्थापना केली. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत धनखड यांनी अजमेर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी दिली; पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर १९९३ मध्ये राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत ते किशनगढ मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. योगायोगाने त्याच निवडणुकीत देवीलाल यांचे दुसरे नातू अजय सिंह चौटाला (अभय चौटाला यांचे आताचे प्रतिस्पर्धी) यांनी राजस्थानमधील नोहर मतदारसंघातून इंडियन नॅशनल लोक दलाच्या तिकीटावर विजय मिळवला होता.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि इंडियन नॅशनल लोकदलाचे प्रमुख अभय सिंह चौटाला (छायाचित्र एएनआय)

देवीलाल यांच्याकडूनच राजकारणात येण्याची प्रेरणा : धनखड

२१ डिसेंबर २०२४ रोजी देवी लाल यांचे पुत्र (अभय व अजय यांचे वडील) ओमप्रकाश चौटाला यांचं निधन झालं, तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सर्वात आधी पोहोचलेल्या व्यक्तींपैकी धनखड हे एक होते. त्यावेळी धनखड म्हणाले, “पाच दिवसांपूर्वी मी चौटाला साहेबांशी (ओम प्रकाश चौटाला) बोललो होतो आणि ते माझ्या तब्येतीची चौकशी करत होते. त्यांना माझ्याबद्दल अधिक काळजी होती… त्यांचे निधन माझ्यासाठी एक मोठी हानी आहे… शेतकऱ्यांचा विकास आणि गावांची प्रगती हेच त्यांचे ध्येय होते.” दरम्यान, यावर्षी मार्चमधील एका कार्यक्रमात धनखड यांनी देवीलाल यांची आठवण काढली. “देवीलालजी यांच्याकडूनच मला राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली,” असं ते म्हणाले होते.

हेही वाचा : गैरसोय होऊनही मराठे मुंबईतच ठाण मांडून; आता न्यायालयाच्या आदेशानंतर पुढे काय?

धनखड यांचा राजीनामा स्वेच्छेने नाही : अभय चौटाला यांचा आरोप

२१ जुलै २०२५ रोजी संसदेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अभय चौटाला यांनी यामागे कटकारस्थान असल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर शेतकऱ्यांची आश्वासने पूर्ण करण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली. “भाजपा अशा व्यक्तीला स्वीकारू शकत नाही, जो शेतकरी आणि त्यांच्या कल्याणाबद्दल बोलतो. चौधरी देवीलाल यांच्याकडून राजकारण शिकलेले धनखडजी फक्त शेतकऱ्यांच्या कल्याणाबद्दल बोलतात. त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला नसून, मोदी-शाह यांच्या नेतृत्वाने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे,” असं त्यावेळी चौटाला मिळाले होते.

आम्ही आमच्या लहानपणापासून धनखडजींना ओळखतो. आमच्या कुटुंबाचा सुखदुःखात त्यांनी आम्हाला साथ दिली आहे, असं अभय चौटाला यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. दरम्यान- अभय सिंह यांच्यापासून दुरावलेले देवीलाल यांचे पुत्र रणजितसिंह चौटाला यांनीही धनखड हे आमच्या कुटुंबातील सदस्य असल्याचं म्हटलं. रणजितसिंह हे अपक्ष आमदार आहेत. २०१९ ते २०२४ या काळात ते मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील हरियाणा सरकारमध्ये मंत्री होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.