पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून ठप्प असलेली अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची सुरुवात शुक्रवारपासून झाली असून, आता ‘सीबीएसई’च्या निकालामुळे प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर होऊ शकणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होतात. यंदा अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया वेळेत पार पाडण्याच्या दृष्टीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने मेमध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू करून विद्यार्थ्यांना नोंदणी करणे आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची मुभा दिली.

 राज्य मंडळाने दहावीचा निकाल १७ जूनला जाहीर केला. मात्र, अन्य मंडळांचे निकाल प्रलंबित राहिल्याने शासनाच्या निर्देशानुसार अन्य मंडळांच्या दहावीच्या निकालांसाठी प्रक्रिया थांबवण्यात आली. त्यामुळे गेला महिनाभर प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. अन्य मंडळांचे निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया २२ जुलैपासून सुरू करण्याचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिले होते. त्यानुसार महाविद्यालयांचे पसंतीक्रम आणि प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

आता ‘सीबीएसई’ने दहावीचा निकाल जाहीर केल्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग दोन, महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आदी प्रक्रिया पूर्ण करण्याबरोबरच प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रकही जाहीर होऊ शकणार आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती https://pune.11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. 

राज्याचा दहावीचा निकाल ९७.४२, तर बारावीचा ९०.२९ टक्के

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. त्यात दहावीचा निकाल ९४.४० टक्के, तर बारावीचा ९२.७१ टक्के लागला असून, महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा दहावीचा निकाल ९७.४१ टक्के, तर बारावीचा निकाल ९०.४८ टक्के लागला. राज्याचा दहावीचा निकाल ९७.४२ टक्के आणि बारावीचा निकाल ९०.२९ टक्के लागला. देशपातळीवरील दहावीच्या निकालात २ लाख ३६ हजार ९९३ विद्यार्थ्यांना, तर बारावीच्या १ लाख ३४ हजार ७९७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पद्धतीत बदल करून दोन सत्रांची परीक्षा घेतली.  दरवर्षीच्या तुलनेत निकाल यंदा लांबला. या पार्श्वभूमीवर सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर केला. देशपातळीवरील एकूण निकालाचा गेल्या वर्षीच्या तुलनेत आढावा घेतला असता दहावीचा निकाल ४.६४ टक्के, तर बारावीचा निकाल जवळपास सहा टक्क्यांनी घटला आहे.

पुढील परीक्षेच्या तारखा

निकालाबरोबरच सीबीएसईकडून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या परीक्षेच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार श्रेणीसुधार परीक्षा २३ ऑगस्टपासून, तर बारावीची नियमित परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरूच आहे. तसेच आता प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. ‘सीबीएसई’चा निकाल जाहीर झाल्याने आता पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी, पहिल्या फेरीचे वेळापत्रक पुढील दोन-तीन दिवसांत जाहीर करण्यात येईल. 

– मीना शेंडकर, सचिव, अकरावी ऑनलाइन प्रवेश समिती