पुणे : सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा असून त्यामुळे कोणाशीही अगदी सहजपणे संवाद होणे शक्य झाले आहे.या सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत.तेवढे तोटे देखील असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे.त्याबाबत सांगायचे झाल्यास पुण्यातील उच्च शिक्षित कुटुंबातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची ऑनलाईन पब जी गेम खेळताना,एका तरुणाशी मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.त्यानंतर त्या तरुणीने प्रियकरासोबत थेट पश्चिम बंगाल गाठल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला मुलीचा शोध घेऊन तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

पुढील अधिक तपासात आरोपींने अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे.त्यामुळे आरोपी प्रयण सिंघा विरोधात लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत कलम वाढ करण्यात आली.

या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक मनीषा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार,17 वर्षीय अल्पवयीन तरुणीकडे तिच्या पालकांचे दुर्लक्ष झाल्यामुळे ती सोशल मीडियावर अधिक सक्रिय असायची, तसेच तिच्या मनातील भावना ती फक्त तिच्या बहिणीकडे व्यक्त करत असायची.मागील वर्षी 2024 मे च्या दरम्यान तिने पब जी गेम डाऊनलोड केली आणि ती तासनतास खेळत असायची,यावरून तिचे कुटुंबातील सदस्य तिला सारखे ओरडायचे,त्यावेळी पब जी गेम खेळताना तिची प्रयण सिंघा या तरुणाशी मैत्री झाली.ते दोघे सुरुवातीला व्हॉट्सऍप मेसेज आणि कॉलवर बोलू लागले. त्याच्या मैत्रीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झाले.

त्याच दरम्यान आरोपी प्रयण सिंघा हा अल्पवयीन तरुणीला पुण्यात भेटण्यास आला आणि पश्चिम बंगाल येथील त्याच्या गावी घेऊन गेला. आरोपीचे लोकेशन पश्चिम बंगाल येथील नागर काटा गावातील दाखवले.त्यानुसार आम्ही स्वत सोबत महिला हवालदार कांबळे आणि पो अंमलदार गायकवाड अशी टीम त्या गावामध्ये पोहोचलो. तिथे तीन दिवस आरोपी प्रयण सिंघा याचा शोध घेतल्यावर तो मिळाला त्याला ताब्यात घेऊन पुण्यात आलो. आरोपी प्रयण सिंघा याने अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे अल्पवयीन तरुणीने जबाबात सांगितले असून आरोपी तरुणाकडे चौकशी सुरू आहे.या प्रकरणी आरोपी प्रयण सिंघा याच्यावर अल्पवयीन तरुणीला पळून घेऊन जाणे आणि लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.