पुणे : उत्तराखंडमधील धराली परिसरात ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी आणि मंचर येथील २४ पर्यटक अडकले आहेत. संबंधित पर्यटक सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तेथील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने आणि इंटरनेट सुविधा बंद पडल्याने संपर्कात अडथळे येत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

अवसरी येथील २२ पर्यटकांचा समूह एक ऑगस्ट रोजी उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेला आहे. मंचर येथील दोन पर्यटक वैयक्तिक गेले आहेत. २२ जणांच्या समूहाचे शेवटचे स्थान हृषीकेश येथील आहे. हे अंतर दुर्घटना घडलेल्या ठिकाणापासून दूर असून ते पर्यटक सुखरूप आहेत. वैयक्तिकरीत्या गेलेल्या पर्यटकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. मंत्रालयातील मदत कक्षाच्या मदतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

ढगफुटीमुळे परिसरातील रस्ते, वीज, दूरध्वनी, इंटरनेट सुविधा कोलमडून पडल्याने संपर्कात अडथळे येत आहेत. ज्या कुटुंबातील व्यक्ती उत्तराखंड येथे गेले असतील त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२०-२६१२३३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी केले आहे.

उत्तराखंड येथील प्रशासनासोबत संपर्क साधण्यात आला असून, २२ पर्यटकांचा समूह सुखरूप आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांना मदत पुरवली जात आहे. रस्तेमार्ग सुरू होण्यास कालावधी लागेल. त्यामुळे नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये. अडकून पडलेल्या पर्यटकांना सुखरूप आणण्यात येईल.- गोविंद शिंदे, प्रांताधिकारी, आंबेगाव