पुणे : पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केवळ १२ तासांच्या कालावधीत चार मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत. दोन वेगवेगळ्या शहरांतील रुग्णालयांमधील मृत दात्यांकडून मिळालेल्या चार मूत्रपिंडांचे यशस्वी प्रत्यारोपण चार रुग्णांवर करण्यात आले. यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळू शकले आहे.
कोल्हापूरमधील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्याचदिवशी लोणी (अहिल्यानगर) येथील विखे पाटील हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला मेंदूमृत घोषित करण्यात आले. या दोन्ही रुग्णांची चार मूत्रपिंडे प्रत्यारोपणासाठी नातेवाइकांच्या संमतीने उपलब्ध करून देण्यात आली. विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने वेळेवर मूत्रपिंड योग्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी समन्वय साधला. दोन वेगवेगळ्या शहरांतील दात्यांकडून अवयव आणणे आणि चारही रुग्ण गंभीर स्थितीत असताना प्रत्यारोपण वेळेवर पूर्ण करणे हे आव्हान डॉक्टरांसमोर होते.
याबाबत मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश काकडे म्हणाले की, कोल्हापूरमधील मृत दात्याची दोन मूत्रपिंडे आणि लोणीतील मृत दात्याची दोन मूत्रपिंडे अशी एकूण चार मूत्रपिंडे प्रत्यारोपणासाठी उपलब्ध करून देण्यात आली. मूत्रपिंडविकाराने ग्रस्त आणि मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांची प्रत्यारोपणासाठी निवड करण्यात आली. कोल्हापूरमधून आणलेली दोन मूत्रपिंडे पुण्यातील ६५ वर्षीय पुरूष आणि नाशिकमधील ३८ वर्षीय पुरूष अशा दोन रुग्णांना प्रत्यारोपित करण्यात आली. प्रवरा येथून आणलेली दोन मूत्रपिंडे पुण्यातील ५७ वर्षीय पुरुष आणि साताऱ्यातील ६७ वर्षीय स्त्री रुग्णामध्ये प्रत्यारोपित करण्यात आली. या दोन्ही रुग्णांची मूत्रपिंडे निकामी झालेली होती. या चारही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. या चारही रुग्णांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.
प्रत्येक प्रत्यारोपणात अचूकता आणि वेळेचे पालन आवश्यक होते. वैद्यकीय पथकाने योग्य समन्वय साधून चारही रुग्णांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. अवयव दानाच्या एका निर्णयामुळे अनेक जीव वाचू शकतात आणि गरजू रुग्णांनाही आशेचा किरण मिळतो. दर वर्षी देशभरात हजारो रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज भासते. त्यामुळे अवयव दाता म्हणून नोंदणी करणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे.- डॉ. सूर्यभान भालेराव, वरिष्ठ शल्यचिकित्सक