पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार डेअरी कर्मचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागातील महंमदवाडी परिसरात घडली. याप्रकरणी मोटार चालकासह चौघांना पोलिसांनी अटक केली.

सनी अंबादास मिसाळ (वय २७, रा. ललकार मित्र मंडळाजवळ, ताडीवाला रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालक अमान समीर मणियार (वय २१, रा. हांडेवाडी), अरेझा निझाद इंजिनिअर (वय २१, रा. उंड्री), पार्थ राकेश पांडे (वय २३, रा. रावेत, पिंपरी-चिंचवड), तरुण महेश निहलानी (वय २६, रा. उंड्री) यांना अटक करण्यात आली. याबाबत मिसाळ याच्या भावाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसाळ हा एका खासगी दूध डेअरीत पर्यवेक्षक आहे. २१ ऑक्टोबर रोजी डेअरीतील एका कर्मचाऱ्याने सुट्टी घेतली होती. त्यामुळे मिसाळ हा सकाळी साडेसहाच्या सुमारास महंमदवाडी परिसरातून कामावर निघाला होता.

रहेजा व्हिस्ट सोसायटीसमोर भरधाव मोटारीने दुचाकीस्वार मिसाळला धडक दिली. अपघातात मिसाळ गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या मिसाळ याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकासह चौघांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करत आहेत.