पुणे : अमेरिकेतील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीच्या आमिषाने संगणक अभियंत्याची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पृथ्वीराज सिंग, अविनाश मिश्रा, प्रवीण गुप्ता अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. याबाबत एका ५१ वर्षीय संगणक अभियंत्याने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत होते. सध्या ते काम करत नाहीत. नोकरीच्या शोधात असलेल्या संगणक अभियंत्याच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. अमेरिकेतील एका नामांकित कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषाने चोरट्यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी एक लाख २७ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तपास करत आहेत.