पुणे : शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज बोगदा मार्ग (ट्वीन टनेल) करण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रकल्पाच्या पूर्व व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी जागतिक पातळीवर निविदा प्रक्रिया मागविण्यात आली असून, त्याला तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. या निविदांची छाननी करून एका कंपनीला प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्याचे काम दिले जाणार आहे.

शहरात पूर्व ते पश्चिम जोडणारे अनेक रस्ते आहेत. मात्र, उत्तर ते दक्षिण जोडणारे मार्ग कमी आहेत. त्यामुळे ‘पीएमआरडीए’ने येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग करण्याचे निश्चित केले होते. येरवडा आणि कात्रज या दरम्यानचे अंतर अंदाजे वीस किलोमीटर आहे. या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते.‘शहरातील वाहतूक सुधारावी, यासाठी येरवडा ते कात्रज हा भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनेल’ पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा आणि त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा,’ असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पीएमआरडीए’चा अर्थसंकल्प मंजूर करताना फेब्रुवारी महिन्यात दिला होता. त्यानुसार पीएमआरडीए प्रशासनाकडून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या नियोजित प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि मुख्य रस्त्यांवरील वाहतूककोंडी कमी होईल,’ असा दावा पीएमआरडीए प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

या प्रकल्पाचा पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी तीन कंपन्यांनी निविदा प्रक्रियेला प्रतिसाद दिला आहे. त्यांची तपासणी सुरू झाली असून, एका कंपनीला हे काम देण्यात येणार आहे.शहराच्या मध्यवर्ती भागातून हा बोगदा जाणार असून, यामध्ये दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा होणार आहे. बोगदा कोठून सुरू होणार आणि त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, हे प्रकल्पाचा सविस्तर आराखडा झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, प्रति किलोमीटर चारशे कोटी रुपयांचा खर्च प्रशासनाने गृहीत धरला आहे. व्यवहार्यता अभ्यासामध्ये या प्रकल्पाचे तांत्रिक आणि आर्थिक मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रकल्पाचा तपशीलवार व्यवहार्यता अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.

अन्य पर्यायही तपासणार

प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीसह (पीपीपी) अन्य प्रारूप पर्यायांचा शोध घेतला जाणार आहे. त्यामध्ये ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरण करा’ (बीओटी) आणि हायब्रिड ॲम्युनिटी माॅडेलसारख्या (एचएएम) पर्यायांचाही विचार करण्यात येण्याची शक्यता आहे.

येरवडा ते कात्रज बोगदा करण्याच्या दृष्टीने जागतिक पातळीवर सल्लागार नियुक्तीचे प्रस्ताव निविदेच्या माध्यमातून मागविण्यात आले होते. त्याला तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांपैकी तपासणी करून येत्या काही दिवसांत एका कंपनीला काम दिले जाईल. या कंपनीकडून ‘डीपीआर’ केला जाईल.- डाॅ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए