तरुणाईच्या पसंतीस उतरणाऱ्या कार्यक्रमांच्या बनावट प्रवेशिकांची  फेसबुकच्या माध्यमातून विक्री करणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने पालघर जिल्ह्य़ातील नालासोपारा भागातून नुकतीच अटक केली. दहावीनंतर शाळा सोडलेल्या या तरुणाने फावल्या वेळेत बनावट प्रवेशिकांची विक्री करून अनेकांना हातोहात गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे.

सध्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक या समाजमाध्यमांवर तरुणाई सक्रिय असते. पुणे-मुंबईसारख्या शहरात किमान महिन्याला एक मोठा कार्यक्रम असतो. पाश्चात्त्य संगीतावर आधारित कार्यक्रमांची चलती असते. तरुणाईची अशा कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. या कार्यक्रमांच्या प्रवेशिकांची विक्री ऑनलाइन माध्यमातून केली जाते. तरुणाईच्या पसंतीस उतरणाऱ्या कार्यक्रमांच्या बनावट प्रवेशिकांची  फेसबुकच्या माध्यमातून विक्री करणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने पालघर जिल्ह्य़ातील नालासोपारा भागातून नुकतीच अटक केली. दहावीनंतर शाळा सोडलेल्या या तरुणाने फावल्या वेळेत बनावट प्रवेशिकांची विक्री करून अनेकांना हातोहात गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे.

नववर्षांच्या स्वागतासाठी मुळशी तालुक्यातील भूगाव येथे सनबर्न फेस्टिव्हल गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आला होता. सनबर्न फेस्टिव्हलला स्थानिकांनी मोठा विरोध केला होता. भूगाव येथील एका खासगी जागेत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाच्या प्रवेशिका हातोहात संपल्या. पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरु तसेच देशातील अन्य भागातील तरुणाई या महोत्सवात सहभागी झाली होती. सनबर्न फेस्टीव्हलच्या प्रवेशिकांची विक्री ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली होती. कोंढवा भागातील रिध्दांत संगमनेरकर (वय २०) याने प्रवेशिकांबाबत चौकशी केल्यानंतर प्रवेशिका उपलब्ध नव्हत्या. दरम्यान, रिद्धांतच्या फेसबुक खात्यावर एकाने सनबर्न फेस्टिव्हलच्या प्रवेशिका उपलब्ध असल्याचा संदेश पाठविला होता. फेसबुकवर सनबर्न फेस्टिव्हलची बनावट प्रवेशिका टाकण्यात आली होती. त्यामुळे रिद्धांतने फेसबुकवर संदेश पाठविलेल्या तरुणाशी तातडीने संपर्क साधला आणि प्रवेशिकांबाबत विचारणा केली.

त्याने फेसबुकवर संदेश पाठविणाऱ्या अज्ञाताच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. प्रवेशिकांसाठी १६ हजार ९०० रुपये भरावे लागतील, असे त्याने रिद्धांतला सांगितले होते. त्यानंतर रिद्धांतला एका पेटीएम खात्यावर पैसे भरण्याची सूचना त्याने केली होती. रिद्धांतने पेटीएमवर पैसे भरले, मात्र त्याला प्रवेशिका मिळाल्या नाहीत. रिद्धांतने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. त्यानंतर मोबाइल क्रमांक बंद असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने याबाबत नुकतीच कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फसवणूक तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार आल्यानंतर पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी तपास सुरू केला होता. रिद्धांतची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा माग कसा लागला याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक झेंडे म्हणाल्या, रिद्धांतला ज्या पेटीएम खात्यावर पैसे भरण्याची सूचना करण्यात आली होती. त्या पेटीएम खात्याची तांत्रिक पडताळणी करण्यात आली. पडताळणीत पेटीएमला जोडलेला मोबाइल क्रमांक हुजेफा हनीफ घराडे (वय १८, सारा अपार्टमेंट, नालासोपारा, जि. पालघर) याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त नीलेश मोरे यांच्या सूचनेनुसार आरोपी हुजेफाला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तातडीने रवाना झाले.

हुजेफाला नालासोपारा भागातील घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन मोबाइल संच, चार सिमकार्ड, डेबीट कार्ड, पेनड्राईव्ह, लॅपटॉप, सनबर्न फेस्टिव्हलची एक प्रवेशिका जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने अशा पद्धतीने पाच ते सहाजणांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्य़ात अटक केल्यानंतर त्याला कोंढवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.  हुजेफाने दहावीनंतर शिक्षण घेतले नाही. त्याचे वडील आखाती देशात काम करतात. शिक्षण सोडल्यानंतर फावल्या वेळात पैसे कमाविण्यासाठी हुजेफाने फसवणूक करण्याचे गुन्हे केले. कार्यक्रमांच्या बनावट प्रवेशिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याची बतावणी करून त्याने फसवणूक केली. त्यासाठी त्याने फेसबुक, पेटीएम या माध्यमांचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आई-बहिणीसोबत राहणाऱ्या हुजेफाने झटपट पैसे कमाविण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे केले असून या गुन्ह्य़ांबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी काही गुन्ह्य़ांत तक्रारदारांकडून तक्रारी देण्यात आल्या नाहीत, असे पोलीस निरीक्षक झेंडे यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक मंदा नेवसे, हवालदार अस्लम अत्तार, अब्दागिरे, गावडे, बिचेवार, दिवाणे यांनी आरोपीला पकडण्यासाठी परिश्रम घेतले.

rahul.khaladkar@expressindia.com