पुणे: मान, पाठ आणि मणक्याच्या दुखापतीने शरीराचा एखादा भाग निकामी झालेली माणसे जगणे विसरून जातात. कालपर्यंत स्वत:च्या पायावर उभी राहणारी ही माणसे अपघातातून बचावल्यावर अपंगत्वाचा सामना करतात, तेव्हा त्यांच्यात लढण्याचे बळ देण्याचे काम ‘द असोसिएशन ऑफ पीपल विथ डिसेबिलिटी’ (एपीडी) करत आहे. या संस्थेने शहरात सुरू केलेल्या पुनर्वसन केंद्रात सहा महिन्यांत ५० जणांना मदतीचा हात पुढे करून जगण्याची नवी उमेद दिली आहे.

‘एपीडी’च्या वतीने मांजरी खुर्द येथे ‘सेंटर फॉर स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी रिहॅबिलिटेशन अँड रिसर्च’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा पहिल्या वर्धापनदिन झाला. ‘या केंद्राच्या माध्यमातून अपघातग्रस्तांचे पुनर्वसन केले जात असून, गेल्या सहा महिन्यांत सुमारे ५० जणांना विनामूल्य प्रशिक्षण देरण्यात आले आहे. त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी, रोजगार मिळवण्यासाठी आणि अपघाताच्या धक्क्यातून सावरत स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करण्यात आली आहे,’ अशी माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. शेरॉन मॅथ्यू आणि डॉ. अद्वैत गुलाटी यांनी दिली.

मॅथ्यू म्हणाल्या, ‘रस्त्यावरचे अपघात, उंच इमारतींच्या छतावरून कोसळून मणक्याच्या दुखापती झालेल्या कित्येक माणसांना हात-पाय गमवावे लागतात. कित्येकांच्या शरीराचे भाग निकामी होतात. शस्त्रक्रियेतून केवळ जीव वाचतो. मात्र, त्यांच्यात जगण्याची उमेद राहत नाही. शरीराने आणि मनाने अधू झालेल्या अशा माणसांना पुनर्वसनाची अत्यंत गरज असते. मात्र, शहरातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये त्यांच्यासाठी परवडणारे उपचार नसतात. अचानक अपंगत्व आलेल्यांना जवळच्या माणसांकडूनही केवळ सहानुभूती मिळते.

समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. त्यांना पहिल्यासारखे काम करता येत नाही. समाजात मुक्तपणे वावरताही येत नाही.’‘जगण्याची इच्छा गमावलेल्या माणसांना नवी उमेद देण्यासाठी सेंटरमध्ये प्रयत्न केले जातात. इतरांवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाते. तज्ज्ञांच्या माध्यमातून योग्य उपचार केले जातात. मणक्याच्या दुखण्याबरोबरच त्यांच्या मनावर झालेली जखम भरून काढण्यासाठी इथे सगळ्या प्रकारची मदत केली जाते.

सेंटरमध्ये ‘व्हीलचेअर’वर आणलेला माणूस जाताना मात्र आत्मविश्वास घेऊन जातो. बाहेरच्या जगात वावरताना त्याच्या मनात न्यूनगंड राहत नाही. इथे येणाऱ्या अपघातग्रस्तांवर केवळ रुग्ण म्हणून उपचार केले जात नाहीत, तर पुनर्वसनासाठी आवश्यक असणारी मदतही केली जाते. मोफत ‘व्हीलचेअर’ देण्यापासून, ती चालवण्याचे बळ आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते,’ असे मॅथ्यू यांनी सांगितले.‘इथे आलेला अपघातग्रस्त रुग्ण राहत नाही. तो समाजात आत्मविश्वासाने वावरतो. निराशेवर मात करून परिस्थितीचा सामना करण्याचे बळ त्यांच्यात येते. त्यातूनच केंद्राचे काही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व करतात. अशा प्रकारचे यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारे पाठबळ सेंटरच्या माध्यमातून दिले जाते,’ असे डॉ. गुलाटी म्हणाले.

मणक्याच्या दुखापतीमुळे अपंगत्व आलेल्या माणसांसाठी जगणे संघर्षाचे होते. अशा वेळी कुटुंबातल्या माणसांबरोबरच आजूबाजूच्या लोकांनीही त्यांना सावरण्यासाठी मदत करायला हवी. समाजाने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. – डॉ. शेरॉन मॅथ्यूव्यवस्थापक, सेंटर फॉर स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी रिहॅबिलिटेशन अँड रिसर्च

मदतीसाठी संपर्कमणक्याच्या दुखापतीमध्ये अपंगत्व आलेल्यांसाठी मांजरी खुर्द येथील ‘एपीडी’च्या केंद्राकडून मोफत उपचार केले जातात. अधिक माहितीसाठी http://www.apdindia.org या संकेतस्थळावर किंवा मांजरी-वाघोली रस्त्यावरील केंद्राच्या कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन डॉ. शेरॉन मॅथ्यू यांनी केले.