पुणे : जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी संशोधन करून एकस्व अधिकार (पेटंट) प्राप्त केलेल्या डॉ. रेणुका बल्लाळ आणि डॉ.भरत बल्लाळ यांच्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पुण्यातील या दाम्पत्याला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जैविक कचरा जाळताना जंतू विसर्ग होऊन त्या परिसरातील लोकांना गंभीर आजार होतात. ही बाब लक्षात घेऊन जंतुसंसर्गाचा शास्त्रीय अभ्यास करून भविष्यकाळामध्ये लोकांच्या आरोग्यास अपाय होऊ नये यासाठीचे तंत्रज्ञान डॉ. रेणुका आणि डॉ. भरत बल्लाळ यांनी विकसित केले. त्यांच्या या तंत्रज्ञानामुळे जंतुविसर्ग न करता कचरा जाळला जातो. त्यांच्या या संशोधनाला एकस्व अधिकारही प्राप्त झाले आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या संशोधकांना यंदा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यात बल्लाळ दाम्पत्याचा समावेश आहे.

हेही वाचा…राज्यात पुण्यातील पुरुष सर्वाधिक तणावग्रस्त! जाणून घ्या यामागील कारणे…

या संशोधनाची दखल घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी निमंत्रित केल्याचा आनंद डॉ.भरत बल्लाळ यांनी व्यक्त केला. कचरा जाळताना जंतुसंसर्ग टाळणारे जगातील एकमेव तंत्रज्ञान विकसित केले आहे. समाजासाठी अतिशय उपयुक्त असे हे तंत्रज्ञान आहे. मात्र जंतुसंसर्गाबाबत अद्यापही समाज आणि प्रशासनात पुरेशी जागृती नाही. ती झाल्यास कचरा जाळून होणारा जंतुसंसर्ग टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.

संशोधनाला ५० लाखांचे अनुदान

डॉ. बल्लाळ दाम्पत्याला जैविक कचरा विल्हेवाटीचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या संशोधनासाठी केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानासाठी देशभरातून साडेसात हजारांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले होते. त्यातून डॉ. बल्लाळ दाम्पत्याच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A scientist couple from pune will get the honor of attending the republic day ceremony pune print news ccp 14 psg