पुणे : दरीपूल ते नवले पूल या दरम्यान सातत्याने होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी वाहने न्युट्रल केल्यास थेट गुन्हे दाखल करणे, पोलीस चौकी उभारणे, अतिरिक्त रम्बल स्ट्रीप्स बसविणे, जड वाहने आणि दुचाकी वाहनांना वेगळे करणे, सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे, जड वाहने सेवा रस्त्यांवर न जाण्यासाठी अडथळे बसविणे अशा तातडीच्या उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिसरातील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून पुन्हा उपाययोजना सांगण्यात आल्या.
मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ २३ एप्रिल रोजी झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर समितीची बैठक पार पडली. या अहवालानुसार या ठिकाणचे अपघात रोखण्यासाठी तातडीने आणि दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. बैठकीला पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस उपायुक्त, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय), सेव्ह लाइफ फाउंडेशन आदी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा >>>पिंपरीतील मालमत्तांचे ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘दरीपूल ते नवले पूल या दरम्यान वाहने न्युट्रल करण्यात येतात. त्यामुळे ब्रेक निकामी होत नसले, तरी त्यांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे या टप्प्यात वाहने न्युट्रल करता येणार नाहीत. तसेच या दरम्यान जड वाहनांसाठी आता ६० ऐवजी ४० कि.मी. प्रतितास एवढा वेग कमी करण्यात येणार आहे. कात्रज नवीन बोगद्यापासून २००-३०० मीटरवर पोलीस चौकी उभारण्यात येईल. खेड शिवापूर पथकर नाका आणि पोलीस चौकी येथे अपघात होऊ नयेत म्हणून काळजी घेण्याबाबत उद्घोषणा करण्यात येईल. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी दोन वाहने तैनात असतील. या वाहनांतून वेग नियंत्रण ओलांडण्यांवर, मार्गिका मोडणाऱ्यांवर, वाहने न्युट्रल करणाऱ्यांवर जागेवर कारवाई केली जाणार आहे. जांभूळवाडी ते नवले पूल या पट्ट्यांत महामार्गावर आणखी रम्बल स्ट्रीप्स बसविण्यात येणार आहेत. पोलीस चौकी परिसरात अत्याधुनिक पीटीझेड कॅमेरा बसविण्यात येणार आहे. दरीपूल येथून जड वाहने सेवा रस्त्यांवर जाऊ नयेत म्हणून रोड हाइट बॅरियर बसविण्यात येणार आहे.’
हेही वाचा >>>पुणे : स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये चालायचा वेश्या व्यवसाय; दलालासह चार तरुणी ताब्यात
दरम्यान, दरीपूल ते मुठा नदीपात्र या भागातील सेवा रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे महापालिकेने तातडीने काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या परिसरात एखाद्या वाहनाचे ब्रेक निकामी झाल्यास स्वतंत्र जागा तयार करण्यात येणार आहे. अशी जागा पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात करण्यात आली आहे, असे एनएचएआय पुणेचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.
वेग नियंत्रण केंद्र
जड वाहने आणि दुचाकी यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहेत. बाह्यवळण मार्गावर ही दोन्ही वाहने एकत्र येऊ नयेत म्हणून वेग नियंत्रण केंद्र (सेपरेशन ॲण्ड स्पीड कण्ट्रोल प्लाझा) उभारण्यात येणार आहे. हे केंद्र कुठे उभारायचे ते ठिकाण लवकरच निश्चित केले जाणार आहे. तसेच एनएचएआयकडून मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, कन्नड, मल्याळम अशा विविध भाषांत दरीपूल ते नवले पूल या दरम्यान डिजिटल फलक लावण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.