पुणे : गुजरात निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेल्या आम आदमी पक्षाने (आप) आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेची सुरुवात २८ मे रोजी पंढरपूर येथून विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने होऊन ६ जूनला राज्याभिषेक दिनी रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे.

हेही वाचा >>> आता शाळांमध्ये ‘हा’ विषय अनिवार्य… शिक्षणमंत्री म्हणाले, ‘आता शिक्षण मराठीतूनच…’

आम आदमी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व प्रदेश सह-प्रभारी गोपाल इटालिया यांच्यासोबत मुकुंद किर्दत, विजय कुंभार, धनंजय शिंदे, विजय फाटके उपस्थित होते. स्वराज्य यात्रा सात जिल्ह्यांतून जाणार असून, या जिल्ह्यातील शहरे व गावांमध्ये सभा होणार आहेत. ही यात्रा ७८२ किलोमीटरचा प्रवास करेल. इटालिया यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा होईल. इटालिया यांनी गुजरातमध्ये ‘आप’ला १३ टक्के मतदान मिळवून दिल्याने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. या वेळी इटालिया म्हणाले की, आज महाराष्ट्रात सर्वत्र प्रशासनच राज्य करत आहे. देशातला आणि जगातली सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणारा भाजप महाराष्ट्रात हरण्याच्या भीतीने एकही निवडणूक होऊ देत नाही. त्यामुळेच प्रशासन मनमानी कारभार करते आहे. भ्रष्टाचारावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. या दडपशाही विरोधात आवाज उठवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील सुराज्य आणण्यासाठी ‘आप’ वचनबद्ध आहे.