पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ३६७ कोटी रुपये अनुदान अपहार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले आठ वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एकाला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने संगमनेर परिसरातून अटक केली. कमलाकर रामा ताकवाले (वय ४०, रा. सराफनगर, पैठण, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. २०१२ ते २०१५ या कालावधीत लोकशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास केंद्र शासनाकडून ४८४ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने समाजमाध्यमात सहाव्यांदा बनावट खाते

मातंग समाजातील पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनखाली समाजकल्याण विभागातील अधिकारी, महामंडळातील जिल्हा व्यवस्थापकांची समिती स्थापन करण्यात आली होती. २०१२ ते २०१५ या कालावधीत  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, तत्कालीन आमदार रमेश कदम, व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे, महामंडळातील पदाधिकाऱ्यांनी संगनमत करुन ३६७ कोटी रुपयांचा अपहार केला होता.

हेही वाचा >>> येरवडा कारागृहात ‘भाईगिरी’; चार कैद्यांवर गुन्हा

शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणात रमेश कदम यांच्यासह २६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून कदम कारागृहात आहेत. या गुन्ह्यातील आरोपी कमलाकर ताकवाले गेले आठ वर्षे पसार होता. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. ताकवाले नाव बदलून अहमदनगर जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची माहिती सीआयडीच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानंतर ताकवालेला संगमनेर परिसरातील एका हाॅटेलमधून अटक करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused in anna bhau sathe mahamandal scam arrested after eight years pune print news rbk 25 zws