शहरात घरोघरी फिरून ओला आणि सुका कचरा गोळा करणारे ‘स्वच्छ’ संस्थेचे तेवीसशे कचरावेचक मेटाकुटीला आले आहेत. महापालिकेकडून अपेक्षित असलेल्या सोयीसुविधा योग्यवेळी मिळणे दूरच, पण आवश्यक साधने व सोयी मिळणेच बंद झाल्यामुळे पदरचे पैसे खर्च करून कचरा गोळा करण्याची वेळ या सेवकांवर आली आहे.
 घराघरांतून कचरा गोळा करण्याचे काम महापालिकेने ‘स्वच्छ’ या संस्थेला दिले आहे. त्यासाठीचा करार सन २००८ मध्ये झाला असून, साडेतीन ते चार लाख घरांमधून कचरा गोळा करण्याचे काम ‘स्वच्छ’ संस्थेचे तेवीसशे कचरावेचक रोज करतात. महापालिकेबरोबर झालेल्या कराराप्रमाणे कचरा गोळा करण्यासाठीची आवश्यक साधने तसेच वाहने संस्थेला देणे पालिकेवर बंधनकारक आहे. मात्र, करारानुसार कोणतीही साधने वेळेवर मिळत नसल्यामुळे कचरावेचकांना या साधनांशिवाय काम करावे लागत आहे.
कचरा गोळा करताना आवश्यक असलेले रबरी हातमोजे तसेच तोंडावर लावण्यासाठी मास्क यासह ओला-सुका कचरा ठेवण्यासाठीच्या प्लॅस्टिकच्या मोठय़ा बादल्या, एकत्र केलेला सुका कचरा ठेवण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या यासह झाडू, साबण, फिनेल वगैरे साहित्य महापालिकेकडून कधीही वेळेवर दिले जात नाही, अशी तक्रार संस्थेच्या कार्यकारी संचालक लक्ष्मी नारायणन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.
कचरा गोळा करण्याच्या या प्रक्रियेत संस्थेसमोर आता सर्वात मोठी समस्या उभी राहिली आहे, ती कचरा गोळा करण्यासाठी ज्या घंटागाडय़ा वापराव्या लागतात त्यांची. ढकलगाडी आणि सायकलगाडी अशी दोन प्रकारची वाहने ‘स्वच्छ’चे कचरावेचक कचरा गोळा करण्यासाठी वापरतात. मात्र, या गाडय़ांची अतिशय दुरवस्था झाली असून, महापालिकेबरोबर सातत्याने पत्रव्यवहार करूनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गाडय़ा नादुरुस्त झाल्या की त्या दुरुस्त करून देणे तसेच जुन्या गाडय़ांच्या जागी नवीन गाडय़ा देणे ही प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे कचरा गोळा करताना विशेषत: कचरा जमा झाल्यानंतर तो ठेवलेली गाडी ढकलताना सेवकांना ते अतिशय त्रासदायक होते. गाडय़ांची अवस्था चांगली नसल्यामुळे कचरावेचकांच्या कामावरही त्याचा परिणाम होतो.
गाडय़ा नादुरुस्त झाल्यामुळे त्या दुरुस्त करून घेण्यासाठी महापालिकेच्या व्हेईकल डेपोकडे पाठवणे, किरकोळ दुरुस्ती असेल तर ती जागेवर करणे याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे अखेर ‘स्वच्छ’ संस्थेनेच आतापर्यंत पंचवीस लाख रुपये खर्च करून गाडय़ा घेतल्या आहेत. तसेच अनेकदा गाडय़ांची दुरुस्तीदेखील वेळोवेळी संस्थेकडूनच करून घेतली जात आहे. चाक पंक्चर होणे, वेल्डिंगसारखी किरकोळ कामे कचरावेचक स्वखर्चानेच करत आहेत. त्याबरोबर स्थानिक नागरिकांकडून देणगी गोळा करूनही काही गाडय़ा घेण्यात आल्याचे लक्ष्मी नारायणन यांनी सांगितले.
‘स्वच्छ’ संस्थेला तीन महिन्यांपूर्वी रबरी हातमोजे, मास्क तसेच बादल्या, मोठय़ा पिशव्या हे सर्व साहित्य देण्यात आले आहे. आणखी साहित्य देण्याची प्रक्रियादेखील सुरू आहे.
– श्रीनिवास कंदुल
भांडार विभाग प्रमुख, पुणे महापालिका.

घंटागाडय़ा आणि सायकलगाडय़ा नादुरुस्त झाल्या असतील, तर त्यांची तपासणी करून त्या दुरुस्तीसाठी पाठवणे ही जबाबदारी त्या त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तसेच तेथील आरोग्य अधिकाऱ्यांची आहे. त्यांच्याकडून नादुरुस्त गाडय़ा आल्यानंतर आठवडय़ात त्या आम्ही दुरुस्त करून पाठवतो. दुरुस्तीचे कोणतेही काम प्रलंबित नाही. नवीन गाडय़ांची मागणी आल्यानंतर त्याचा आढावा घेऊन उपलब्ध निधीनुसार त्यांची खरेदी केली जाते.
– किशोर पोळ
व्हेईकल डेपो प्रमुख, पुणे महापालिका