पुणे : व्यावसायिकांकडून दुकानासमोरील मोकळ्या जागांचा व्यवसायासाठी केला जाणारा वापर, रहिवासी मिळकतींच्या वापरात बदल न करता व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या मिळकती यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून तीनपट मिळकतकर वसूल करण्यात येणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी मिळकतकर विभागाच्या निरीक्षकांना हे आदेश दिले आहेत. मिळकतकर विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व निरीक्षकांना ठरावीक ‘उद्दिष्ट’ दिले जाणार असल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले.

महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून मिळकतकर विभागाकडे पाहिले जाते. पहिल्या सव्वादोन महिन्यांत सुमारे १४०० कोटी रुपयांचा मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. तर, यंदाच्या वर्षी मिळकतकर विभागाला ३२५० कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट अंदाजपत्रकात देण्यात आले आहे. मिळकतकराच्या उत्पन्न वाढविण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, यावर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. आणि मिळकतकर विभागाचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी दोन दिवसांपूर्वी बाणेर, बालेवाडी भागात संयुक्त पाहणी केली होती. त्या वेळी हाॅटेलचालकांकडून दुकानाच्या पुढील माेकळ्या जागेत शेड, मांडव टाकून व्यवसाय केला जातो. इमारतीच्या आवारातील माेकळ्या जागेचा व्यावसायिक वापर हाेतो. तसेच, निवासी जागेचा व्यावसायिक वापर हाेत असल्याचे आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर मोकळ्या जागांचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्यांकडून तीन पट मिळकतकर वसूल करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले.

याबाबत अधिक माहिती देताना पृथ्वीराज म्हणाले, ‘मिळकतकर विभागाला नव्याने ७० जणांचे मनुष्यबळ मिळाले आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मिळकतकर निरीक्षकांना एका महिन्याला ठरावीक ‘उद्दिष्ट’ निश्चित करून दिले जाईल. त्यांनी दर महिन्याला नवीन मिळकतींची नाेंदणी करणे, मिळकतींच्या वापरात झालेल्या बदलानंतर नव्याने कर आकारणी करणे. तसेच, अनधिकृतपणे वापर हाेणाऱ्या ठिकाणी कारवाई करून वाढीव कराची आकारणी करावी, असे आदेश दिले आहेत. प्रत्येक पंधरा दिवसांनी शहरातील विविध भागात जाऊन भेट देऊन परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी शहरातील ज्या भागातील माेकळ्या जागांचा वापर व्यावसायिक कारणासाठी होतो. त्याची पाहणी करून तेथे वाढीव दराने मिळकतकर आकारणी सुरू करावी. नव्याने बांधकाम झालेल्या मिळकतींना कर आकारणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.- पृथ्वीराज बी. पी. (अतिरिक्त आयुक्त, महापालिका)