पुण्यामध्ये शनिवारी रात्री आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पुण्यासह संपूर्ण देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. दरम्यान याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने त्यांच्या चालकाला पैशांचं आमिष दिलं आणि सांगितलं, आरोप..

काय म्हणाले अजित पवार?

“पुण्यातील घटनेवर मी लक्ष ठेऊन आहे. माझं यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांनी याप्रकरणात जातीने लक्ष घातलं आहे. खरं तर कारण नसताना असा प्रकाराच गैरसमज केला जातो की यात पालकमंत्र्यांचं याकडे लक्ष नाही. मुळात मी माझं काम करत असतो, मला माध्यमांच्या पुढे यायला आवडत नाही. २१ तारखेला ही घटना घडली त्यादिवशी मंत्रालयात होतो की नाही, हे कोणीही जाऊन बघू शकता”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

“दोषींना कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी”

पुढे बोलताना ते म्हणाले, “याप्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप नाही. ही घटना गंभीर आहे. याप्रकारच्या घटना यापुढे घडू नये. कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांची जबाबदारी आहे. याप्रकरणी जे दोषी असतील, त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी, यासंदर्भातील मी वेळोवेळी पोलीस आयुक्तांकडून माहिती घेत आहे. आज सकाळीसुद्धा मी त्यांच्याशी चर्चा केली”

हेही वाचा – पुणे कार अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह सहा जणांना ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

“याप्रकरणी कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही”

यावेळी बोलताना त्यांनी अल्पवयीन आरोपीला मिळालेल्या जामीनावरही भूमिका स्पष्ट केली. “आरोपीला जामीन मिळाला यासंदर्भात माध्यमात अनेक बातम्या आल्या आहेत. जामीन कसा द्यावा, हा न्यायालयाचा विषय आहे. मात्र, यासंदर्भात जी भूमिका घ्यायला पाहिजे, ती भूमिका घेण्यात आली. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप करण्यात आलेला नाही. पोलिसांनी पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून मी, आम्ही तिघेही पहिल्या दिवसापासून लक्ष ठेवून आहोत”, असे ते म्हणाले.

पुण्यातील पब संस्कृतीवर दिली प्रतिक्रिया

“पुण्यात अवैध पब संस्कृती वाढली असून त्यावर कारवाई सुरू आहे. चुकीच्या कामाला मी नेहमीच विरोध केला आहे. याविरोधात कडक कारवाई केली गेली पाहिजे, असं माझं मत आहे. खरं तर कोणीही वेडेवाकडे प्रकार करू नये, अशा प्रकरणांमध्ये राजकारण्यांनी आणि प्रशासनाने हस्तक्षेप करू नये”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली