पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रासह (एमआयडीसी) परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह (पीएमआरडीए) इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत सव्वा दोनशेपेक्षा अधिक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याने या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरी समस्या सोडवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

चाकण एमआयडीसीसह परिसरातील अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्यासाठी १० सप्टेंबरपासून संयुक्तरित्या मोहीम राबविण्यात येत आहे. यात पुणे नाशिक महामार्ग- चाकण चौक ते एकतानगर, पुणे महामार्ग- एकतानगर ते चाकण चौक, तळेगाव चाकण शिक्रापूर- चाकण चौक ते तळेगाव, तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता व चाकण चौक ते शिक्रापूर या भागातील एकूण २३१ अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली. पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांनी चाकण भागातील अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर कारवाईच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय यंत्रणांना निर्देश दिले होते.

या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावी, अशा नोटिसा संबंधितांना देण्यात आल्या होत्या. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवण्यात येत आहे. संबंधित अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर निर्मूलनाची कारवाई पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, चाकण नगरपरिषद, एमएसआयडीसी या प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

चाकण भागात केलेल्या कारवाईची आकडेवारी

१) १० सप्टेंबर – पुणे नाशिक महामार्ग- चाकण चौक ते एकतानगरमधील (३.१ कि.मी) एकाबाजूची ४० अनाधिकृत बांधकामे हटवली
२) ११ सप्टेंबर – पुणे महामार्ग- एकतानगर ते चाकण चौक भागातील (३.१ किमी) दुसऱ्या बाजूची ११० अनाधिकृत बांधकामावर कारवाई
३) १२ सप्टेंबर – तळेगाव चाकण शिक्रापूर- चाकण चौक ते तळेगाव भागातील दोन्ही बाजूची (१.५ किमी) ४२ अनाधिकृत बांधकामे काढली
४) १५ सप्टेंबर – तळेगाव चाकण शिक्रापूर सहयोग- चाकण चौक ते शिक्रापूरमध्ये दोन्ही बाजूची (१.३ किमी) रस्ता मोकळा करून ३९ अनाधिकृत बांधकामे हटवली.

उपमुख्यमंत्र्यांचा पुढाकार

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील अपुऱ्या पायाभूत सुविधांवरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दा चर्चेत आला. वाहतूक कोंडीसह पायाभूत सुविधांच्या अभावामुळे चाकणमधील उद्योग अडचणीत आले आहेत. अखेर याची गंभीर दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै महिन्यात मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व यंत्रणांची झाडाझडती घेऊन उद्योगांची कोंडी सोडविण्याचे निर्देश दिले. यानंतर ऑगस्ट महिन्यात उपमुख्यमंत्र्यांनी चाकणचा पहाटे दौरा करून शासकीय यंत्रांची झाडझडती घेतली होती. विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यावेळी त्यांनी दिले होते.