सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता असलेल्या आणि निधीअभावी रखडलेल्या उजवा मुठा कालवा रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रखडलेल्या रस्त्याची एक बाजू पूर्ण होत आली असून दुसऱ्या बाजूचे काम पूर्ण झाले आहे. येत्या पंधरा दिवसांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे कित्येक वर्षांनंतर सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी या रस्त्याची पाहणी महापालिका अधिका-यांबरोबर केली. त्यावेळी पंधरा दिवसांत पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. वाहतूक विभागाचे प्रकल्प प्रमुख श्रीनिवास बोनाला, पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित घुले, उदयसिंह शिंगाडे यांच्यासह अन्य महापालिकेचे अभियंता यावेळी उपस्थित होते.

जनता वसाहत, पु. ल. देशपांडे उद्यानामागील रस्ता काँक्रिट करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर वृक्ष छाटणी आणि इलेक्ट्रिक विभागाची कामे १५ दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, असे मिसाळ यांनी सांगितले.

विश्रांती नगर रस्ता , विठ्ठल मंदिर मागील रस्ता, हिंगणे चौक, कालवा रस्ता आदी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मिसाळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांनी केली. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी ही यावेळी करण्यात आली.

अनावश्यक कामांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेला अवघा तीन कोटींचा निधी उपलब्ध करून देता न आल्याने सिंहगड रस्त्याला पर्यायी ठरणारा हा रस्ता गेल्या वर्षभरापासून रखडला असल्याची वस्तुस्थिती पुढे आली होती. पर्यायी रस्ता नसतानाच राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. सिंहगड रस्त्याला पाच पर्यायी रस्ते असले तरी ते कागदावरच राहिल्याची वस्तुस्थिती आहे.

सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून महापालिकेने मुठा नवीन उजवा कालव्याच्या बाजूने फनटाईम चित्रपटगृह ते पु. ल. देशपांडे उद्यान पर्यायी रस्ता करण्याचे प्रस्तावित केले. त्यातील फनटाईम चित्रपटगृह ते हिंगणे या दरम्यानचा रस्ता पूर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. विठ्ठलवाडी चौकातून येणाऱ्या सर्व वाहनांकडून या रस्त्याचा वापर सध्या सुरू आहे. हिंगणे ते पु.ल. देशपांडे उद्यान या दरम्यानच्या रस्त्याचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alternate road to sinhagad road will start in next 15 days pune print news scsg