संस्थेची स्थापना कधी झाली आणि का करावीशी वाटली?
- कनेक्टिंग ट्रस्टची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली. समाजात वाढत चाललेल्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि भावनिकरीत्या संवेदनशील समुदायाच्या गरजेपोटी या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्यात आली. मानसिक भावभावनांवर नियंत्रण ठेवले जाणे गरजेचे असते. त्यासाठी चांगल्या मित्रमैत्रिणींची, नातेवाइकांची साथ, त्यांच्याशी उत्तम संवाद असावा लागतो. आपल्याला काही अडचण आली, तर ऐकून घेण्यासाठी कान देणारी जवळची मंडळी हवीत. पण, या सगळ्यांचा अभाव असला आणि भावभावनांचे योग्य नियंत्रण राखता आले नाही, तर आत्महत्येसारखे विचार मनात येतात. त्यांना त्यांच्या विचारांपासून परावृत्त करण्याचे महत्त्वाचे कार्य संस्था करते. ‘माइंडफुलनेस बेस्ड ॲक्टिव्ह लिसनिंग’ हे संस्थेच्या कामाचे मूळ तत्त्व आहे.
संस्थेच्या कामकाजाचे स्वरूप कसे आहे ?
- मनात आत्महत्येचे विचार येतात आणि जे आत्महत्येमुळे बाधित आहेत अशांना भावनिक आधार तर दिला जातोच, पण त्याचबरोबर जनजागृती केली जाते. यात शालेय विद्यार्थ्यांपासून तरुणाईसोबतही संवाद साधला जातो. या गटाबरोबरच समाजातील विविध स्तरांतील, वयोगटांतील व्यक्तींसाठी सातत्याने काम करून आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृतीचे कार्य संस्थेतर्फे केले जाते. हे सारे काम ट्रस्टच्या चार संरचित प्रकल्पांतर्गत करण्यात येते. डिस्ट्रेस हेल्पलाइन, सुइसाइड सर्व्हायव्हर सपोर्ट, पीअर एज्युकेटर्स, स्टुडंट मेंटल हेल्थ प्रोग्राम आणि अवेरनेस प्रोग्राम असे संस्थेतर्फे चार प्रकल्प चालविले जातात. हेल्पलाइनद्वारे समुपदेशन करताना कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न बाळगता, गोपनीयता ठेवून कोणताही अनावश्यक सल्ला न देता मानसिक, तसेच भावनिक आधार दिला जातो. संस्थेच्या जनजागृती कार्यक्रमांतर्गत भावनिक साक्षरता, मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध या मुद्द्यांवर सत्रे घेतली जातात. याशिवाय भावनिक ताण ओळखणे, त्याविषयी मदत कशी मिळवता येईल हे पाहणे, त्यायोगे आत्महत्या रोखणे अशा प्रकारे कार्यक्रम आयोजिले जातात. वीस वर्षांमध्ये संस्थेच्या सेवांचा एकूण १४ लाख जणांना फायदा झाला असून, सुइसाइड सर्व्हायव्हर्स उपक्रमाचा फायदा ५० हजार जणांना, तर जनजागृृतीचा फायदा ६ लाख ५० हजार जणांना झाला आहे. डिस्ट्रेस हेल्पलाइन आणि पीअर एज्युकेटर्स उपक्रम १५ वर्षांपासून सुरू असून, त्याद्वारे अनुक्रमे ४ लाख आणि ३ लाख जणांना मदत झाली आहे.
संस्थेचे उद्दिष्ट काय आहे?
- आत्महत्येसारखे विचार मनात येत असताना तुमच्याशी योग्य प्रकारे संवाद साधू शकेल अशा व्यक्तीशी संवाद झाला, तर ती व्यक्ती तुम्हाला आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकते. यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते असतील तर चांगलेच. अशा गरजवंतांना कोणतेही शुल्क न घेता हेल्पलाइनच्या माध्यमातून संस्था कार्य करते. केवळ इतकेच नाही तर शाळा, महाविद्यालये, विविध प्रकारच्या आस्थापनांत कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. ज्यांना मानसिक, भावनिक ताणतणाव आहे अशांना आधार देणे, भावनिकरीत्या संवेदनशील समाजनिर्मिती करणे आणि आत्महत्यांचे प्रमाण आटोक्यात आणणे हे ट्रस्टचे ध्येय आहे. कोणतेही चुकीचे विचार मनात आले, अथवा कोणाशी तरी मोकळेपणाने बोलावेसे वाटले, पण योग्य आणि विश्वासार्ह व्यक्ती आपल्या आसपास नसेल, तर ९९२२००४३०५ अथवा ९९२२००११२२ यांपैकी कोणत्याही एका क्रमांकावर सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत संपर्क साधता येतो. याशिवाय सोमवार आणि बुधवार दुपारी दोन ते पाच या वेळेत, तसेच शुक्रवार, शनिवारी दुपारी ३.१५ ते ५.३० प्रत्यक्ष भेटीद्वारे समुपदेशन करण्यात येते.
संस्थेच्या भावी योजना काय आहेत?
- समाजात घडत असलेल्या आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी अजून कोणती विधायक पावले उचलता येतील का, या उद्देशाने एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान आंतरराष्ट्रीय परिषदेत आत्महत्या प्रतिबंधातील विविध घटकांचा आढावा घेण्यात येणार आहे. ही परिषद पुण्यात भरवली जाणार असून, आत्महत्या रोखण्याकरिता कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था, मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक संशोधक आणि विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील.
shriram.oak@expressindia.com