पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका, इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन (आयएमएफ) आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लायम्बिंग असोसिएशन (एमएससीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयएफएससी आशियाई किड्स क्लायम्बिंग चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान पिंपळे सौदागर येथील योगा पार्कमधील अत्याधुनिक स्पोर्ट क्लायम्बिंग कॉम्प्लेक्स येथे होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या क्रीडा विभागाने दिली.

स्पर्धेत १३ देशांतील २०० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पीड क्लायम्बिंग, लीड क्लायम्बिंग आणि बोल्डरिंग या तीन थरारक प्रकारांमध्ये १३ आणि १५ वयोगटातील मुले-मुली कौशल्य सादर करतील. उपायुक्त पंकज पाटील म्हणाले, ‘प्रत्येक भिंतीवरील चढाई ही केवळ वेग आणि कौशल्याचीच नाही, तर मानसिक एकाग्रतेची आणि धैर्याचीही परीक्षा ठरणार आहे. स्पर्धेचे परीक्षण आयएफएससी व आयएमएफकडून नियुक्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दर्जाचे स्पर्धाधिकारी करणार असल्यामुळे स्पर्धेतील सर्व निकष जागतिक दर्जाचे राहतील. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी मिशनच्या सहकार्याने उभारलेल्या अत्याधुनिक केंद्रात ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेमुळे शहरातील क्रीडारसिकांना अद्वितीय अनुभव मिळणार आहे. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये साहस, शिस्त आणि आत्मविश्वास वाढीस लागतो.’

महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेमुळे तरुण खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळपट्टीवर कौशल्य दाखविण्याची उत्तम संधी मिळणार आहे. नागरिकांनीही या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.