पुणे : खेड तालुक्यातील मांजरेवाडीत नदीपात्रात महाविद्यालयीन युवतीचा खून करुन पसार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. तरुणीला दुचाकीवरुन सोडण्याची बतावणी करुन आरोपीने तिला नदीपात्रात नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला विरोध केल्यानंतर आरोपी तिच्या डोक्यात दगड घालून पसार झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवनाथ मांजरे (वय २९) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने नऊ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती खेड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली. युवती राजगुरूनगर भागातील एका महाविद्यालयात अकरावीत होती.

शुक्रवारी (११ एप्रिल) सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आली होती. महाविद्यालयातून सकाळी अकराच्या सुमारास ती घरी निघाली होती. त्या वेळी आरोपी मांजरे दुचाकीवरुन आला. त्याने तिला दुचाकीवरुन घरी सोडतो, असे सांगितले. त्यानंतर युवतीला दुचाकीवरुन घेऊन तो निघाला. शेताला पाणी द्यायचे आहे, असे सांगून त्याने युवतीला मांजरेवाडी पिंपळ-मलघेवाडीतील नदीकाठी असलेल्या उसाच्या शेतात नेले. तेथे युवतीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

युवतीने त्याला विरोध केल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर तिचा मृतदेह १५० फूट ओढत नेऊन त्याने भीमा नदीपात्रात टाकला. युवतीचा खून केल्यानंतर आरोपी मांजरे गावात आला. ताो जऊळके गावातील यात्रेला गेला होता. शनिवारी (१२ एप्रिल) श्री हनुमान जन्मोत्सव होता. आरोपीच्या कुटुंबीयांचे गावात दुकान आहे. आरोपी मांजरे गावातील दुकानात नारळ विक्री करत होता. ‘माझ्या शेताजवळ एका महिलेचा ओरडण्याचा आवाज आला आहे. मी घाबरून तिकडे गेलो नाही’, अशी बतावणी त्याने गावात केली होती.

दरम्यान, महाविद्यालयीन युवती बेपत्ता झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक निरीक्षक स्नेहल राजे आणि पथकाने तपास सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मांजरे याला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने युवतीचा खून केल्याची कबुली दिली.

बहिणीच्या साखरपुड्यापूर्वी खून

महाविद्यालयीन युवतीचा रविवारी (१३ एप्रिल) साखरपुडा होता. साखरपुडा असल्याने कुटुंबीय तयारीत व्यस्त होते. घरात आनंदाचे वातावरण होते. युवतीचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर गावात शोककळा पसरली. युवतीचा खून करणाऱ्या आरोपी मांजरे याला कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शोकाकूल वातावरणात युवतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At pune district khed taluka in manjarewadi village college girl murdered accused arrested pune print news asj