पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणात पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आणि साथीदारांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. बंडू आंदेकरच्या घराच्या झडतीत पोलिसांनी ७७ तोळे दागिने, मोटार, जमीन व्यवहाराची कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर कोमकर खून प्रकरणातील आरोपींच्या २७ बँक खात्यांची पडताळणी करण्यात आली असून, ५० लाख ६६ हजार ९९९ रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे.

विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याचा गोळीबार करून खून करण्यात आला. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १५ आरोपींना अटक करण्यात आली. आंदेकर टोळीला आर्थिक रसद कशी पुरविली जाते, यादृष्टीने पोेलिसांनी तपास सुरू केला आहे.

कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीतील आरोपींची एकूण २७ बँक खाती पडताळण्यात आली आहेत. या खात्यांत ५० लाख ६६ हजार ९९९ रुपयांची रक्कम आढळली. त्यानंतर ही खाती गोठवण्यात आली आहेत.

वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड आहे. गायकवाड याच्यासह आंदेकरचा जावई गणेश कोमकर, त्याचा भाऊ जयंत, मुलगी संजीवनी यांना अटक करण्यात आली अहे. गायकवाड याच्यासह साथीदार सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडून करण्यात येत आहे. कोमकर खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.