पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणात अटकेत असलेल्या आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह साथीदारांची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आदेश दिले.
नाना पेठेतील टोळीयुद्ध, तसेच माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात गणेश कोमकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर बंडू आंदेकरने आयुषच्या खुनाचा कट रचला होता. अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याच्यावर गोळीबार केला होता.
या प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०), त्याचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (वय २७), स्वराज नीलंजय वाडेकर (वय २३), अमन युसूफ पठाण (वय २५), सुजल राहुल मेरगु (वय २०), यश सिद्धेश्वर पाटील (वय १९), अमित प्रकाश पाटोळे (वय १९), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ३६), मुनाफ रिजाय पठाण (वय २८, सर्व रा. नाना पेठ) यांना अटक करण्यात आली होती. आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील विलास पटारे यांनी केली. तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांनी तपासाबाबतची माहिती न्यायालयात दिली. आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. मनोज माने, ॲड. प्रशांत पवार, ॲड. प्रतीक पवार, ॲड. अमित थोरात यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने आंदेकरसह साथीदारांची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, या प्रकरणात यापूर्वी लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय ४०) यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.