लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस, बीबीए), संगणक उपयोजन पदवी (बीसीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली समाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात आली होती. मात्र बऱ्याच उमेदवारांना ही परीक्षा देता न आल्याने पुरवणी परीक्षा घेण्याची करण्यात आलेली मागणी राज्य शासनाने मान्य केली आहे. त्यामुळे आता या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार आहे.

सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आतापर्यंत बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालय स्तरावर होत होती. मात्र अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) हे अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित घेऊन या अभ्यासक्रमांसाठी मान्यता बंधनकारक केली. त्यानंतर या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदाच सीईटी सेलच्या माध्यमातून सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सीईटी सेलतर्फे २९ मे यंदा सीईटी घेण्यात आली. मात्र, उपलब्ध जागांच्या तुलनेत सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी होती. त्यामु‌ळे राज्यभरातील महाविद्यालयांतील हजारो जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त करून संस्थाचालकांनी पुन्हा सीईटी घेण्याची मागणी केली होती.

आणखी वाचा-पुणे : जंगली महाराज रस्त्यावर गॅस गळतीमुळे घबराट

सीईटी सेलच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सीईटी घेण्यात आली. मात्र असंख्य उमेदवार या सीईटीत सहभागी होऊ न शकल्यामुळे उमेदवार, पालक, संस्था यांनी विविध माध्यमातून अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याबाबत विनंती केलेली होती. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून शासनाने बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अतिरिक्त सीईटी घेण्यास मान्यता दिली आहे. संबंधित परीक्षेबाबतच्या सूचना सीईटी सेलमार्फत संकेतस्थळवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.