BJP alleges that NCP is trying to obstruct the projects of interest of Pimpri-Chinchwad | Loksatta

पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताच्या प्रकल्पांना ‘राष्ट्रवादी’कडून खोडा; भाजपाचा आरोप

भ्रष्टाचाराचा खोटे आरोप करून भाजपा नेत्यांना बदनाम केले जात आहे. केवळ आरोप न करता राष्ट्रवादीने ते सिद्ध करावेत, असे प्रत्युत्तर भाजपाकडून देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताच्या प्रकल्पांना ‘राष्ट्रवादी’कडून खोडा; भाजपाचा आरोप
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या हिताच्या प्रकल्पांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक खोडा घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते व पिंपरीचे माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी केला आहे. पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पालिका मुख्यालयात आंदोलन केले. त्यामध्ये भाजपा नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यास भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा- पुणे: शिवाजीनगर न्यायालयातील लाचखोर लिपिकाला पकडले

पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काचे पाणी अडवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी रक्ताचे पाट वाहिले. तरीही शहराला एक थेंबही पाणी मिळाले नाही. आताही भामा आसखेड पाणी प्रकल्पाच्या कामात राष्ट्रवादी खोडा घालत आहे. भ्रष्टाचाराचा खोटे आरोप करून भाजपा नेत्यांना बदनाम केले जात आहे. केवळ आरोप न करता राष्ट्रवादीने ते सिद्ध करावेत. प्रकल्पाला खोडा घालून पिंपरी-चिंचवडकरांचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न करू नये, असे एकनाथ पवार म्हणाले.

हेही वाचा- अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची बदली करण्यास स्थगिती; शिक्षणाधिकारी, उपसंचालकांनी वैयक्तिक मान्यता दिल्यास शिस्तभंगाची कारवाई

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात आणि स्वत:च्या मर्जीतील आयुक्त राजेश पाटील येथे असताना प्रकल्पांचा निधी कमी करणे, निविदा रद्द करणे किंवा कामच बंद करणे अशी अनेक कारस्थाने राष्ट्रवादी काँग्रेसने केली. आता शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून रखडलेले प्रकल्प मार्गी लागत आहेत. याचा राष्ट्रवादी काँग्रेसला पोटशूळ उठला असावा, असा आरोप पवारांनी केला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 17:15 IST
Next Story
पुणे: शिवाजीनगर न्यायालयातील लाचखोर लिपिकाला पकडले