BJP MP Medha Kulkarni On Pune Railway Station : “पुणे रेल्वेस्थानकाचं नामांतर करावं”, अशी मागणी भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, “पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं. तसेच या रेल्वेस्थानकाचं नुतनीकरण करताना परिसरात पुण्याचा इतिहास दिसेल याची काळजी घ्यावी”.

मेधा कुलकर्णी यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “पुणे रेल्वेस्थानकाचं नुतनीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच हे रेल्वेस्थानक पाहताना किंवा रेल्वेस्थानकाचा परिसर पाहताना तिथे कुठेही पुण्याचं अथवा पुण्याच्या देदिप्यमान इतिहासाचं प्रतिबिंब दिसत नाही. त्यामुळे या रेल्वेस्थानकाचं नुतनीकरण करताना पुण्याचा इतिहास प्रतिबिंबित होईल याची काळजी घ्यावी. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील अशीच संकल्पना आहे”.

“पुणे रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं”

भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी यांची संकल्पना आहे की देशातील रेल्वेस्थानकं, विमानतळं अशी असली पाहिजेत की तिथे त्या शहराच्या, आपल्या देशाच्या इतिहासाचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. तेच आता पुण्यातही व्हायला हवं. पुणे रेल्वेस्थानकाचं नुतनीकरण करताना स्थानक परिसरात पुण्याच्या इतिहासाचं प्रतिबिंब दिसावं. प्रामुख्याने पुणे रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं अशी मागणी मी केली आहे”.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “थोरले बाजीराव पेशवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार केला. त्यांनी हिंदवी स्वराज्याचा कटक ते अटक असा विस्तार केला. त्यांचा शनिवारवाडा हे त्या स्वराज्याचं प्रतीक आहे. पुणे हे त्या स्वराज्याचं केंद्र होतं. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव दिलं जावं”.