पुणे : ‘सध्या मराठी भाषेकडे खूप दुर्लक्ष होत आहे. भाषेतील बारकावे लक्षात घेतले जात नाहीत. आपली मराठी टिकून राहण्यासाठी लिखित भाषेशी प्रामाणिक राहण्याची गरज आहे,’ असे मत राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी रविवारी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिपुष्प’ दिनदर्शिकेचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल टिळक, अभिनेते योगेश सोमण, संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

‘शाब्दिक निष्ठा काहीच कामाची नसते. ती कृतीतूनही दिसली पाहिजे,’ असे सांगून कुलकर्णी म्हणाल्या, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रावर भारतीय कालगणना नमूद केलेली असते. आपला देश हा खूप अभिमानास्पद गोष्टींनी भरलेला आहे. दिनदर्शिकेतून त्या रोज घराघरांत जातात. त्यामुळे दिनदर्शिका निर्माण करताना आपला सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा समोर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’

‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तटस्थपणे विचार केल्यास ते भावतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य प्रभावी आहे. त्यावर आधारलेली दिनदर्शिका प्रत्येकासाठी प्रेरणा ठरेल,’ असे सोमण यांनी सांगितले.

‘पुढच्या पिढीपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी नव्या माध्यमांचा, युवा वर्गाच्या भाषेचा वापर करायला हवा,’ असे टिळक म्हणाले.

‘बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न’

‘ऐतिहासिक नाटकात काम करणारे एक खासदार मला एकदा म्हणाले, ‘ताई तुमच्या पुण्याचे ठीक आहे. तुमची भाषा प्रमाण आहे. मात्र, ग्रामीण भागातील माणसाच्या भाषेचे काय करायचे,’ अशा प्रकारे बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न केला जातो,’ असा टोला कुलकर्णी यांनी लगावला. त्या म्हणाल्या, ‘बोली भाषेत लिहितानाही अनुस्वारासारखे नियम पाळावेच लागतात. प्रत्येकानेच आपली भाषा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’