पुणे : पुणे जिल्ह्यातील काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करण्यात आली आहे. उद्यापासून (१८ एप्रिल) ही भाडेवाढ लागू होणार असून, पहिल्या दीड किलोमीटर अंतरासाठी सुधारित भाडेदर ३१ रूपये करण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी भाडेदर २१ रूपये करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) डॉ. अजित शिंदे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (पुणे, पिंपरी- चिंचवड व बारामती) बैठकीत खटुआ समितीच्या शिफारशीला अनुसरून भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राधिकरणाचे सदस्य सचिव आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी १८ एप्रिल ते १६ जून २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. संबंधित वाहने मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे सादर करावीत. सुधारित भाडेदर १८ एप्रिलपासून मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेणाऱ्या टॅक्सीधारकांसाठी लागू राहणार आहे.

हेही वाचा…. पुणे: मौजमजेसाठी दुचाकी चोरी; बीडमधील चोरट्यांकडून दहा दुचाकी जप्त

मीटर पुन:प्रमाणीकरण न केल्यास कारवाई

दिलेल्या मुदतीत मीटर पुन:प्रमाणीकरण करून न घेणाऱ्या टॅक्सीधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुदतीत मीटर पुन:प्रमाणीकरण न केल्यास मुदत समाप्तीनंतर प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी एक दिवस परवाना निलंबन होईल. मात्र सात दिवसांपुढील विलंबासाठी कमाल निलंबन कालावधी ४० दिवस राहणार आहे. निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा पर्याय निवडल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रूपये शुल्क असेल. किमान तडजोड शुल्क ५०० रूपये आणि कमाल तडजोड शुल्क २ हजार रूपयांपर्यंत असेल, असेही शिंदे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black yellow taxis fare will be expensive in pune pune print news stj 05 dvr